प्रेम, बंधूभाव व शांततेचा संदेश देण्यासाठी सर्वांसाठी प्रेषित उपक्रमाचे आयोजन !!

प्रेम, बंधूभाव व शांततेचा संदेश देण्यासाठी सर्वांसाठी प्रेषित उपक्रमाचे आयोजन !!

      इस्लाम आणि इस्लामचे प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करण्यासाठी प्रेषित मोहम्मद सर्वांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गैर मुस्लिम समाजामध्ये इस्लाम व प्रेषित मोहम्मद यांचा प्रेम, शांतता व बंधूभावाचा संदेश अधिकाधिक प्रमाणात पोचवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे इस्लाम व प्रेषित मोहम्मद  यांच्याबाबतचे गैरसमज दूर होण्यासाठी या उपक्रमाचा मोठा लाभ होईल, असा विश्वास या उपक्रमाचे निमंत्रक व इस्लाम जिमखानाचे अध्यक्ष माजी आमदार अँड युसूफ अब्राहणी व्यक्त केला. अब्राहणी पत्रकार परिषदेत बोलत होते त्यावेळी असोसिएशन ऑफ मुस्लिम प्रोफेशनलचे अध्यक्ष अमीर इद्रिसी व सईद खान उपस्थित होते.

       ९ ऑक्टोबरला असलेल्या प्रेषित मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद ए मिलादच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अल्पसंख्याक संस्थांतर्फे चालवण्यात येणाऱ्या मुंबईतील सुमारे ५०० नोंदणीकृत मशीदी, सुमारे ४०० शाळा व २० महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

       या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या पालकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत असल्याची माहिती अमीर इद्रिसी यांनी दिली. या नागरिकांनी आपापल्या मित्रमंडळी, शेजाऱ्यांपैकी किमान पाच जणांना जेवणासाठी आमंत्रित करुन त्यांना प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलची माहिती ९ ऑक्टोबरला द्यावी असे आवाहन इद्रिसी यांनी केले आहे.

      जास्तीत जास्त जणांपर्यंत प्रेषित मोहम्मद यांची शिकवण जाण्यासाठी त्यांची शिकवण  सांगणारे बॅनर्स, पोस्टर्स विविध रेल्वे स्थानके, बस स्थानके, मशीदींजवळील परिसर व सार्वजनिक परिसरात ८ ऑक्टोबरला लावण्यात येणार आहेत. सध्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम व प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दलचे गैरसमज पसरत आहेत. हे गैरसमज दूर करुन सर्वांपर्यंत प्रेषित मोहम्मद व इस्लामची खरी शिकवण पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्याचाच भाग म्हणून हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती अब्राहणी व इद्रिसी यांनी दिली.

      अनाथाश्रम, वृध्दाश्रम, अंध व्यक्तींचे आश्रम, रुग्णालये अशा विविध ठिकाणी अन्न व फळे वाटप करण्यात येईल. प्रेषितांच्या जयंतीनिमित्त समाजातील विविध वर्गाच्या नागरिकांना जेवणासाठी निमंत्रित करुन त्यांच्याशी चर्चा करुन त्यांना प्रेषित मोहम्मद यांची शिकवण याबाबत माहिती देण्यात येणार आहे.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर