
गिरणगावची ओळख, चलचित्र स्मारक !!
गिरणगावची ओळख म्हणून श्वास प्रतिष्ठान अध्यक्ष प्रतीक कदम आणि संकल्पना सुशोभीकरण निर्मिती ग्रुप यांच्या मागणीनुसार विस्मृतीत होत असलेल्या गिरण्यांच्या धुरांद्याचे चलचित्र प्रतिकृती स्मारक लोअर परळ, सेनापती बापट मार्ग यादव चौक येथील, माजी अध्यक्ष शिवसेना नेते दत्ताजी नलावडे (दादा) चौक येथे आदित्य उद्धव ठाकरे (पर्यावरण, पर्यटन, राजशिष्टाचार मंत्री) यांच्या मार्गदर्शनाने महापौर सौ किशोरी किशोर पेडणेकर, मा महापौर नगरसेवक स्नेहल आंबेकर यांच्या निधीतून, मुंबईतील पहिले चलचित्र गिरणीचा साचा आणि धुरांद्याची प्रतीकृती चे स्मारक मा आमदार गणपत कदम यांच्या हस्ते आणि आमदार सुनील शिंदे यांच्या उपस्थितीत नुकतेच उभारले आहे.
तत्पूर्वी लालबाग परळ, शिवडी लोअर परळ अशा गिरणगावामध्ये गिरणी संपामुळे आकाशाला गवसणी घालणाऱ्या चिमणी, धुराचे भोंगे मुके झाले. आता उंच उंच गगनचुंबी इमारती आंतरराष्ट्रीय कंपन्या, पंच तरांकित हॉटेल्स, शॉपिंग मॉल्स, ई त्याचप्रमणे कॉम्प्लेक्स मध्ये स्विमिंग पुल्स, टेनिस कोर्ट, बाग बगीचे, राहणीमान उंचावत गिरणगाव बिल्डर लॉबीने ताब्यात घेतले आहे.
सन १९८२ च्या गिरणी कामगरांच्या संपाने गिरणगावची कामगारांची, त्यांच्या कुटुंबीयांची वाताहत झाली. सन १९९१ साली तत्कालीन सरकारने बंद पडलेल्या, पाडलेल्या आजारी गिरण्यांच्या जागा विकसित करुन काही भाग गिरणी मालकांना विकण्यास परवानगी दिली आणि आजारी गिरण्या पूर्ववत सुरू कराव्या अशी सरकारची अपेक्षा होती. परंतू गिरणी मालकांनी भव्य दिव्य अशा इमारती बांधून विक्री केली. परंतू कामगारांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. गिरणी संपामध्ये सूनित खटाव, ठक्कर, डॉ दत्ता सामंत, त्याचप्रमाणे कित्येक कामगारांचे खून झाले. असा मराठी माणसाचा इतिहास, मुंबईच्या गिरणी कामगारांची चळवळ हा कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा होता. संयुक्त महाराष्ट्र लढ्याला ताकद गिरणी कामगारांनी दिली. मुंबईच्या विकासाला कोणी नाही म्हटले नाही. गिरणी कामगारांना घरे मिळावीत म्हणून कै. दत्ता इस्विलकर यांनी लढा दिला. आणि काही हजार घरे कामगारांना मिळाली आहेत. गिरणगाव चा इतिहास, संस्कृती, त्यांचे प्रश्न, आयुष्याचे वास्तववादी चित्र, प्रत्यक्ष लोअर परळ येथे वास्तव केलेले, गिरणी कामगार म्हणुन काही काळ काम केलेले, साहित्यिक, पत्रकार, समीक्षक, अखिल भारतीय साहित्य अकादमी पुरस्कार विजेते कै. जयंत पवार यांनी गिरणी कामगारांचे प्रश्न, वस्ताववादी घटनांचे लेखन अधांतर, लालबाग परळ आणि "कोण नाय कोण्या" ह्या पुस्तकांवर चित्रपट, नाटक निर्माण झाले आहेत. गिरणगाव आणि गिरणी कामगारांवर खूप लिहिले गेले आहे. त्याचा फक्त थोडक्यात मागोवा.