
वरळी कोळीवाडयाकडे लोकप्रतिनिधी लक्ष देतील का ??
मुंबई दि.२३ काही दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडुप संकुलात पाणी भरलं होतं, त्यामुळे संकुलातील पाणी शुद्धीकरण बंद पडलं होतं. आणि पावसाच्या पाण्यामुळे पाणी अतिशय गढूळ झालं. त्यामुळे मुंबईकरांचे शुध्द पाण्या वाचून हाल झाले. पाणी अजूनही अशुद्ध येत आहे. वरळी कोळीवाडा येथे पिण्याच्या पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
काही दिवस झाले पाणी माती मिश्रित गढूळ लाल रंगाचे येत आहे. पाणी इतके गढूळ आहे की उकळवून सुद्धा पिऊ शकत नाहीत. आधीच करोनाच्या महामारीचं सावट, घरातील परिस्थिती बिकट अश्यात वरळी कोळीवाड्यातील लोकांना बिस्लेरी पाण्याच्या बॉटल विकत आणून पाणी प्यावं लागत आहे. दुसरा पाण्याचा पर्यायही नाही, परंतु वरळी कोळीवाडा येथील लोकप्रतिनिधींची भेट देऊन देखील नागरिकांची दखल घेतली गेली नाही. म्हणून वरळी गावाचे रहिवाशी नाराज झाले आहेत. वरळी कोळीवाड्यातील राजकीय पुढारी निष्काळजीआहेत. पंपिंग हाऊस मध्ये पाणी जाईपर्यंत सरकार झोपले होते का? तुमच्या चुका आम्ही का भोगायच्या? हे पाणी आम्ही प्यायच का? मग तुम्हाला मत कशाला द्यायची? मुंबई एवढं महागडं शहर असून आमची पाण्या वाचून दयनीय अवस्था व्हावी, ही खेदाची बाब आहे असे संतप्त उदगार वरळी गावचे चिडलेले रहिवाशी काढत आहेत.