
सकारात्मक बातम्या दाखवा !!
करोनाच्या दुसऱ्या लाटे मुळे रूग्णांची दर रोज वाढ होत आहे. मृत्यूदर पण वाढत आहे. त्यामूळे नाईलाजास्तव सरकारने १ मे पर्यंत कडक निर्बंध लावले आहेत. तरी प्रसार माध्यमांतून बातम्या प्रसारीत करतांना दर रोज करोना लागण झाल्यामुळे मृत्यु पावलेल्यांचे आकडे प्रसारीत करून रुग्णालयातील दृश्य दाखविण्यात येत आहे. तेच ते वृत्त परत परत दिवसभर दाखविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे स्मशानभूमीतील दृश्य दाखविण्यात येत आहेत.
अशी नकारात्मक दृश्य दाखवल्यामुळे करोना संबंधी जनतेमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे. या भीतीदायक वातावरणामुळे रुग्णांच्या मनात निराशेची भावना निर्माण होऊन जास्त माणसे मृत्यू मुखी पडत आहेत. अशा नकारात्मक बातम्या प्रसारीत करण्यापेक्षा करोनातून बरे झालेल्यांच्या मुलाखती, रुग्णालया मधील डॉ, नर्स, कर्मचाऱ्यांनी आपली कशी काळजी घेतली म्हणुन आपल्या मध्ये उत्साह निर्माण झाला आणि आपण बरे झालो, अशा सकारात्मक बातम्या प्रसारीत झाल्यास, जनतेने सरकारी नियमावली पाळल्यास आपण नक्कीच करोना ची साखळी तोडू शकू आणि ह्या आजारा पासून मुक्त होऊ शकू. प्रसार माध्यमांनी सकारात्मक बातम्या प्रसारीत करावयास हव्यात.