
कामगार कल्याण मंडळ मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार !!
कामगार कल्याण मंडळ मध्ये कोट्यावधीचा भ्रष्टाचार !!
कामगार कल्याण मंडळामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार ! महेंद्र तायडे, सहाय्यक कल्याण आयुक्त यांच्या निलंबनाची मागणी ! तायडे यांच्यावर कठोर कारवाईचे कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे संकेत !!!!
राज्यात सरकार कोणत्याही पक्षाचे असो भ्रष्ट अधिकाऱ्यांना ज्या त्या विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी अभय देत असतात आणि याऊलट मंत्र्यावर केवळ आरोप झाले तरी त्यांना राजीनामा द्यावा लागतो आणि कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय मंत्र्याची चौकशी सुरू केली जाते हे महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. परंतु कामगार कल्याण मंडळाचे सहाय्यक कल्याण आयुक्त महेंद्र तायडे यांची मंडळातील मुळ नियुक्ती बोगस असणे, तायडे यांच्याकडे कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार असताना एन.आय.टी नागपूर प्रकल्प कामगार हिताचा नसताना बेकायदा १० कोटी रुपये बांधकामासाठी अदा करणे, मंडळातील विभागीय कार्यालयातून प्रस्ताव नसताना कार्यालयीन डेटा जतन करण्यासाठी सुमारे ४ कोटी रुपयांच्या मशिनरी खरेदी करणे, अन्य बांधकाम भ्रष्टाचार, गृह मंत्र्यांच्या निर्देशानुसार तायडे व त्यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची लाचलुचपत विभागाकडून प्रलंबीत अपसंपदा उघड चौकशी आणि अन्य प्रशासकीय गैरकारभाराबाबत कामगार सचिवांना पुरावे देऊनही तायडे यांना कामगार विभागातील उपसचिव श्रीकांत पुलकुंटवार, तत्कालीन सहसचिव तथा विद्यमान कामगार आयुक्त महेंद्र कल्याणकर, कक्ष अधिकारी शरयु मोरे अभय देत असल्याचे सिटीजन्स जस्टीस प्रेस काँसिल ऑफ महाराष्ट्र संघटनेचे सरचिटणीस रफिक मुलाणी यांनी दिनांक १४ एप्रिल रोजी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटीदरम्यान निदर्शनास आणले. भ्रष्ट कारभारामुळे कल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार माहे ऑक्टोबर २०२० मध्ये कमी केल्यानंतर कामगार विभागातील अधिकाऱ्यांनी तायडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करून उच्चस्तरीय चौकशी करण्याऐवजी तायडे यांना बेकायदा उपकल्याण आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार दिला असल्याची गंभीर बाब रफिक मुलाणी यांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणली.
सदर शिष्टमंडळामध्ये तायडे यांना निलंबीत करावे या मागणीसाठी कामगार नेते नागेश सावंत, जिशान पटेल हे अनेक कामगारांसह उपस्थित होते. महेंद्र तायडे यांच्याकडून कामगारांच्या कल्याणासाठी राखीव असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या कल्याण निधीवरच डल्ला मारला गेल्याने कामगार वर्गात असंतोष दिसत होता. कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी यापूर्वी देखील मी स्वतः मंडळातील गैरकारभारावर कठोर कारवाई करत भ्रष्टाचारी तत्कालीन कल्याण आयुक्तांना सेवेतून बडतर्फ केल्याची आठवण करून देत, महेंद्र तायडे यांच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन भेटीस आलेल्या शिष्टमंडळास दिले, तसेच तायडे यांच्यावर कारवाई करणेबाबत मंत्रालयातील कामगार विभागास निवेदनामार्फत निर्देश दिले.