सामूहिक बलात्कार व पोक्सो मधील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन !!

सामूहिक बलात्कार व पोक्सो मधील आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन !!

      मुंबई - सामूहिक बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या १९ वर्षीय आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. या घटनेतील पीडित मुलगी १७ वर्षांची असून ती स्वतः घराबाहेर निघून आरोपींसोबत गेल्याचे व त्यांच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे सकृतदर्शनी दिसत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी हा निकाल दिला. मोठया प्रमाणात खटले प्रलंबित असल्याने नजिकच्या भविष्यकाळात हा खटला सुनावणीस येण्याची शक्यता दुरापास्त आहे. १९ वर्षीय आरोपीला तोपर्यंत कोठडीत ठेवल्याने त्याचे कठोर गुन्हेगारात रुपांतर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. आरोपीच्या वतीने ज्येष्ठ वकील अॅड. मजीद मेमन, अॅड. मतीन कुरैशी व अॅड. खलील गिरकरयांनी काम पाहिले तर सरकारच्या वतीने ए.ए.टाकळकर यांनी काम पाहिले.  आरोपीला ३० हजार रुपयांच्या जामीनावर सोडण्याचे आदेश देण्यात आले. 

        या प्रकरणातील आरोपी सुमारे दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत.याप्रकरणी आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद केला की, आरोपीला या प्रकरणात चुकीच्या पध्दतीने गोवण्यात आले आहे. पीडितेने दिलेल्या जबाबावर पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी याप्रकरणी समाधानकारक व पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.

        या प्रकरणातील पीडित मुलगी कुटुंबिय झोपल्यानंतर स्वतःहून घराचा दरवाजा बाहेरुन बंद करुन मित्रासोबत गेली आहे. तिचे वर्तन संशयास्पद आहे. पीडित मुलीला संधी असतानाही तिने घरी जाण्याचा पर्याय स्वीकारला नाही उलट तिच्या वडिलांचा दूरध्वनी आल्यावर तिने मोबाईल स्वीच ऑफ केला. केवळ एका आरोपीसोबत न जाता ती विविध ठिकाणी विविध मित्रांसोबत स्वतःहून गेली. पहिल्या आरोपीने तिच्या मनाविरोधात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिचा दुसरा मित्र तिला तिथे घ्यायला आला ती त्याच्यासोबत एका बांधकाम साईटवर गेली. तिथे त्यांच्यामध्ये पुन्हा शारीरिक संबंध झाले. त्यानंतर त्या मुलाने तिला पैसे दिले व घरी जायला सांगितले मात्र तिला भीती वाटू लागली त्यामुळे ती तिच्या तिसऱ्या मित्राच्या घरी गेली. 

        तिसऱ्या मित्राने तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर अर्जदार आरोपी तिथे आला. तेव्हा पीडितेने आपण घर सोडून आल्याची माहिती आरोपीला दिली त्यावर त्याने तिच्या राहण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले व तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी परत गेली, असे पीडितेने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला गेला आहे. या प्रकरणी मालवणी पोलिस स्थानकात भा.दं.वि. कलम 354, 363, 366 (A), 368, 376, 376 (D, पोक्सो कायद्याचे कलम 4,5,6,8,9 (G) व इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्टचे कलम 67 (A) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. दिंडोशी येथील विशेष न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे.


Batmikar
विशेष प्रतिनिधी - खलील गिरकर

Most Popular News of this Week