
सलाम ह्या कलाकाराला !
(वार्ताहर - अभिजीत पेठे) मुंबई - टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचा छंद अनेकांना असतो. मात्र या छंदातून जागतिक किर्ती फार कमी लोकांना मिळते. मुंबईतील पवईच्या एका चाळीत राहणाऱ्या चेतन राऊतचाही छंद असाच काहीसा. त्याने टाकाऊपासून अनेक टिकाऊ आणि आकर्षक कलाकृती बनवल्या आणि त्याच्या या कलाकृतींना जागतिक किर्ती लाभली.
26 ऑक्टोबर 1988 साली जन्मलेला चेतन खरंतर अभियांत्रिकीचा विद्यार्थी, मात्र त्याला क्रिकेटर बनायचं होतं. क्रिकेटचे धडेही तो गिरवत होता. खेळासोबतच तो सृजन होता. नव्या नव्या कलाकृतींमध्ये त्याला रस होता. परंतु त्याला त्याच्या या कलेची जाणीव झाली नव्हती. त्याच्या क्रिकेटर प्रशिक्षकाने त्याच्यातील कलेचे सुप्तगुण हेरले आणि त्याला कलाक्षेत्रात करिअर करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला त्याच्यासाठी फार मोलाचा ठरला. चेतनने सर जे जे कलामहाविद्यालयातून मास्टर्स इन फाईन आर्ट आणि बॅचरल इन फाईन आर्टचे शिक्षण पूर्ण केलं. तो तंत्रज्ञान आणि कला यांची सांगड घालून कलाकृती तयार करतो. युरोपात मोझेक पोर्टेट कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोझेक पोट्रेट तयार करण्यासाठी युरोपचं नाव घेतलं जातं. मात्र भारतात मोझेक पोट्रेट तयार करणारे फार कमी कलाकार आहेत. त्यामुळे मोझेक पोट्रेट तयार करणाऱ्या देशांच्या यादीत भारताचंही नाव यावं याकरता चेतनने चंग बांधला आहे. आतापर्यंत त्याने नऊ भव्य कलाकृती सादर केल्या आहेत आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्या साऱ्या कलाकृतींची नोंद रेकॉर्ड बुक मध्ये करण्यात आली आहे.
सृजनशील, कल्पकता, परस्परसंवादी आणि उत्तम संघटन नेतृत्त्व अंगी असलेल्या चेतनला मदत करण्यासाठी त्याचे सहकारी नेहमीच तत्पर असतात. कॉन्सेप्ट डिझायनिंग, मॅट पेटिंग आणि व्हिज्युअल डेव्हलोपमेंट यासाठीही तो माहिर आहे. चेतनने केलेल्या आजवरच्या कलाकृती चेतनने सर्वप्रथम बनवलेली कलाकृती म्हणजे 4500 कॅसेट्सपासून तयार केलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोझेक पोट्रेट. हे 321.93 स्केवअरफुटाचे होते.
छत्रपती शिवाजी महाराजाचं मोझेट पोट्रेट बनवण्यासाठी त्याने तब्बल 75 हजार सिडींचा वापर केला होता. हे मोझेक मोट्रेट 10546.875 स्क्वेअर फुटाचे होते. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे मोझेक पोट्रेट साकारण्यासाठी त्याने 87 हजार किबोर्डच्या बटणांचा वापर केला होता. हे मोझेक पोर्टेट 300 स्क्वेअर फुटांचे होते.
पंचमुखी रुद्राक्षापासून त्याने पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे मोझेट पोट्रेट बनवले होते. त्यासाठी त्याने 17000 रुद्राक्षांचा वापर केला होता. हे पोट्रेट 60 फुटांचे होते. सहा हजार प्लास्टिक बॉलपासून एका चिमुकल्याचे मोझेक पोट्रेट साकारण्यात आले होते. हे पोट्रेट जवळपास 64 स्क्वेअर फुटाचे होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पोट्रेट साकारण्यासाठी 23 हजार पंचमुखी रुद्राक्षांचा वापर करण्यात आला होता. हे पोट्रेटदेखील 64 स्क्वेअरफुटांचे होते.
सचिन तेंडूलकर याच्या वाढदिवसादिनी चेतन राऊत याने काही कलाकारांसोबत 46*24 स्क्वेअर फुटाचे मोझेक पोट्रेट बनवले होते. त्यात त्याने 1 लाख शर्टाचे बटन्स, 10 हजार सेफ्टि पिन्स, 500 हॅन्गर्स आणि 4000 मिटर चेनचा वापर केला होता.
आबासाहेब शेवाळे या कलाकारासोबतही चेतनने महेंद्रसिंग धोनी याचे मोझेक पोट्रेट तयार केले होते. यासाठी त्यांनी चेसच्या सोंगट्यांचा वापर केला होता. हे पोट्रेट जवळपास 55.7418 स्क्वेअर फुटाचे होते. त्याचे आताचे पोट्रेट म्हणजे दोन लाख दिव्यांचा वापर करून रामदरबार साकार केला आहे. हा रामदरबार 5400 स्क्वेअर फुटांचे आहे. वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे फाउंडर श्री. पावन सोलंकी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईचे रिप्रेझेंटेटिव्ह श्री. संजय विलास नार्वेकर आणि सुषमा गोविंद तांबडकर यांनी चेतन राऊत यांचा सत्कार केला.