
पर्यटन वसई सुरुची बाग !!
वसई म्हटलं म्हणजे लोकांच्या डोळ्यासमोर लगेच वसईची ताजी भाजी, वसईची केळी, वसईची कागडा, मोगरा, गावठी गुलाब, वसईची ताजी मासळी आणि वसईचा किल्ला व वसईतील विस्तीर्ण सुंदर स्वच्छ समुद्र किनारे डोळ्यासमोर येतात.
वसई हे पोर्तुगीज काळा पासून व्यापारी बंदर म्हणून प्रसिद्ध होते.
ब्रिटीश काळी त्या बंदरातून सुपारी व विड्याची पाने याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होत असे. अजूनही हा व्यापार वसईत सुरू आहे. वसई हा तालुका असुन आता पालघर जिल्ह्यात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
वसईत पाचू बंदर, किल्ला बंदर, अर्नाळा रानगाव, राजोडी, कळंब इत्यादी समुद्र किनारे प्रसिद्ध आहेत. त्यातल्या त्यात कळंब, राजोडी बीच आणि वसई गावातील अतिशय प्रसिद्ध असलेली सुरुची बाग आहे.
वसई गावातील अतिशय रमणीय समुद्र किनारा म्हणजे सुरुची बाग वसईरोड स्टेशनला उतरल्यावर वसई गावात (पश्चिमेला) जाण्यासाठी बस रिक्षा मिळतात.
वसई गावातील सुरुची बाग ही जुहू चौपाटी पेक्षा ही अतिशय सुंदर स्वछ समुद्रकिनारा असलेली आहे. विस्तीर्ण समुद्र किनाऱ्यावर घनदाट सुरुच्या झाडाची बाग दूरवर पसरलेली दिसते. म्हणून ह्या बीचला सुरुची बाग म्हणतात. समुद्र किनाऱ्यावर असलेली घनदाट सुरुच्या झाडांची हिरवळ मन मोहून टाकते. सुरुची बाग ही पर्यटकांचं तसेच वसईतील रहिवासी यांचे पर्यटनाचे आवडते ठिकाण आहे. प्रेमी युगलांची तर रोजच हजेरी लागलेली असते. शनिवार, रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी सुरुची बाग पर्यटकांनी फुलून जाते, समुद्र किनारा विस्तीर्ण आणि दूरपर्यंत उथळ असल्याने लाटांवर डुंबण्याचा खेळण्याचा आनंद घेता येतो.. लहान मुल तर सुरुची बागेचे नाव काढताच एकदम आनंदुन जातात.
समुद्र किनारी सुरुची विस्तीर्ण बाग असल्याने वातावरण दिवसभर थंड असते. संध्याकाळी तर वातावरण एकदम रम्य होऊन जाते. समुद्रात होणारा सूर्यास्ताचा देखावा अतिशय मन मोहून टाकतो. समुद्र किनारी वाळूतून घोड्यावर रपेट मारायला, उंटाची सैर करायला, तसेच घोडा गाडीतुन सैर करायला खूप मज्जा येते. बालगोपाळांना बरोबर मोठेही सैरीचा तसेच लाटांवर डुंबण्याचा आनंद लुटत असतात. भेळपुरी, पाणीपुरी, वडा पाव, सरबत गोळा, आयस्क्रीम, चहा, सगळंच खाण्याचा आनंद तिथे मिळतो.
आता वसई नगरपालिकेने येणाऱ्या पर्यटकांसाठी पाणी पिण्यासाठी पाणपोई, सुलभ शौचालय, इत्यादींची व्यवस्था केली आहे. हा विभाग नेव्ही च्या अधिपत्याखाली येत असला तरी सर्व व्यवस्था वसई नगर पालिका पाहते. सुरक्षिततेसाठी वसई नगर पालिकेने गार्ड ही तैनात केले आहेत. उत्तम पोहणारे तेथील रहिवाशी आदिवासी व कोळी लोक असे काही लोक ही नगर पालिकेने तैनात केले आहेत. त्याजोगे कोणतीही जीवित हानी होऊ नये यासाठी वसई नगरपालिका पर्यटकांसाठी नेहमी जागरूक असते.
सुरुच्या झाडाचं घनदाट जंगल तसेच वसई शहरातील लोक वस्ती पासून दूर असल्यामुळे तेथे संध्याकाळी वेळेचं बंधन आहे. जो पर्यंत उजेड आहे तो पर्यंतच तुम्हाला सुरुच्या बागेत थांबण्याची परवानगी आहे. सूर्यास्त होताच नगर पालिकेचे गार्ड सर्वत्र फिरून शिट्टी वाजवून फिरायला आलेल्या सर्व लोकांना बाहेर काढतात. काही गैर प्रकार घडू नये म्हणून नगरपालिकेने संध्याकाळी ७ नंतर थांबण्यास तेथे कुणालाही परवनगी दिली नाही.
त्यामुळे सुरुच्या बागेत फिरायला जायचा टाइम संध्याकाळी ३ नंतर योग्य आहे. त्या जोगे समुद्रात नाहण व सुर्यास्तचा आनंद लुटायला मिळतो. परंतु मुंबई अथवा इतर ठिकाणाहून पर्यटक येत असतील तर सकाळी येऊन संध्याकाळ पर्यंत फिरून आनंद घेऊ शकतात. किनाऱ्यावर सुरुची घनदाट बाग असल्याने उन्हाचा त्रास होत नाही आणि दुपारी बागेत बसून वन भोजन करीत सुंदर उसळणाऱ्या लाटांच्या समुद्राचा ही मनसोक्त देखावा पाहू शकतो.
अशीही वसईतील सुरुची बाग सर्वच वसईकरांचं, बालगोपालांचं आवडत ठिकाण आणि बाहेरून तसेच मुंबईहून येणाऱ्या पर्यटकांच आकर्षणाच केंद्र.
वसई गावातील सुरुच्या बागेला एकदातरी भेट ध्यावी पर्यटनाचा मनसोक्त आनंद लुटावा असे रमणीय ठिकाण वसई गावातील सुरुची बाग !!!!