
महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांनी सहाय्यक आयुक्तांकडून विकास कामांचा घेतला आढावा !
महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांनी सहाय्यक आयुक्तांकडून विकास कामांचा घेतला आढावा !
बृहन्मुंबई महापालिका २४ विभाग कार्यालयांच्या माध्यमातून मुंबईकर नागरिकांना नागरी सोयी-सुविधा देत असून या सेवा सुविधांची विकास कामे अधिक गतिमान पध्दतीने व्हावीत तसेच ही कामे पूर्ण करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मुंबईच्या महापौर सौ. किशोरी किशोर पेडणेकर यांनी उप महापौर सुहास वाडकर यांच्या उपस्थितीत संबंधित सहाय्यक आयुक्तांची आढावा बैठक घेतली.
महापालिका प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी यातील दुवा म्हणून सहाय्यक आयुक्त हे विभाग स्तरावर नागरिकांना नागरी सोयी सुविधा देण्याचे काम करित असल्याचे महापौरांनी प्रारंभी सांगितले. मुंबईकर नागरिकांना खड्डेमुक्त मुंबई व कचरामुक्त मुंबई करण्याचे जे वचन दिले आहे, त्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत तसेच कचरा संकलनासाठी विभागस्तरावर काम करणाऱ्या सामाजिक संस्था यांच्याकडून अधिकाअधिक व चांगले काम करुन घेण्याचे निर्देश दिले. तसेच सहाय्यक आयुक्तांनी आपल्या संकल्पना सादर कराव्यात जेणेकरुन कायदेशिर व सकारात्मक पध्दतीने काम करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे महापौरांनी सांगितले. तसेच आपआपल्या विभागातील रासायनिक कारखाने यांची यादी सादर करावी व त्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे महापौरांनी सांगितले. त्यासोबतच धोकादायक इमारतीची यादी तयारी करुन त्याबाबतची कार्यवाही करण्यास आतापासूनच सुरुवात करण्याची सूचना महापौरांनी यावेळी केली. त्याचप्रमाणे महापौर निधीत वाढ करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यानशी सविस्तर चर्चा करुन निधीत भरघोस योगदान देण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
त्याचप्रमाणे रस्त्यांवरील नादुरुस्त व काही कारणाने रस्त्यांवर उभ्या राहून वाहतूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची सूचना उप महापौर अॅड. सुहास वाडकर यांनी मांडली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांबरोबर महापौरांनी सविस्तर चर्चा करुन आपण केलेल्या सूचनांप्रमाणे लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. त्यासोबतच रस्त्यांची कामे मोठया प्रमाणात सुरु असून यामध्ये ड्रेनेजची कामे व्यवस्थित होतील याकडे संबधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची सूचना उप महापौरांनी यावेळी केली.
त्याचप्रमाणे यावेळी झालेल्या चर्चेमधील विषयांची यादी व अडचणी या आगामी बैठकीत सादर कराव्यात व त्यावर संबधितांची तातडीने बैठक घेऊन कामे पूर्ण करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.