श्री. स्वामी समर्थ मठ दादर मुंबई
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा दादर मठ श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज सुरतकर यांनी २९ मे १९१० साली स्थापन केला. ह्या मठाला १०८ वर्ष पुर्ण होतील.
श्री बाळकृष्ण महाराज यांचा जन्म सुरत येथे २८ ऑक्टोबर १८६६ साली झाला. लहानपणापासूनच त्यांना देवभक्तीची व नामस्मरणाची आवड होती. पुढे ते आपले चुलते शिवशंकर यांचे कडे मुंबईला शिक्षणासाठी आले. मुंबईस आल्यावर त्यांच्यावर आर्यसमाजाच्या शिकवणीचा पगडा बसला. त्यांचे चुलते शिवशंकर कट्टर शिवभक्त, त्यांना या गोष्टीचे दुःख झाले. त्यांचे शेजारी श्री रामचंन्द्र व्यंकटेश बरडकर उर्फ सारस्वत ब्राम्हण भेंडे, हे महाराजांचे गुरु "तात महाराज" श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त रहात असत. त्यांना महाराजांच्यात सुधारणा करण्यास त्यांनी विनंती केली. त्यांनी श्री सदगुरु बाळकृष्ण महाराजांना भुलेश्वरच्या अष्टभुजादेवीच्या देवळात देवीचे हास्यमुखाचे दर्शन देऊन त्यांच्या वृत्तीमध्ये आमुलाग्र फरक केला व त्याचक्षणी महाराजांनी श्री तातमहाराजांना गुरु करुन ते श्री स्वामी समर्थांचे निःसीम भक्त बनले.
जांभुळवाडीत महाराजांचे शेजारीच धोत्रे नावाचे कुटुंब रहात असे. त्या कुटुंबातील पिशाच्चबाधा महाराजांनी दुर केली व तेंव्हापासुन ते एक दिव्य महात्मे आहेत याची ओळख लोकांना झाली.
महाराजांच्या दैवी सामर्थ्याचा प्रसार झाल्यामुळे पुष्कळ लोक त्यांचेकडे येऊ लागले. महाराजांकडे त्यावेळी कुलाब्यापासुन वसई, घाटकोपर, चेंबुर येथवरची मंडळी दर्शनास व भजनास येत असत इतक्या लांबुन शनिवारी रात्री ते ही त्याकाळात मालाडला भजनास येणे हे गैरसोयीचे असल्याने महाराजांनी कोठेतरी मध्यवर्ती ठिकणी रहाणे सर्वांना सोईस्कर होईल असा विचार भक्तजनांत उत्पन्न झाला. कै. भाऊसाहेब देशमुख त्यावेळी मुंबई कलेक्टरचे हेडक्लार्क असल्यामुळे दादरची पुढे होणारी वाढ त्यांना माहीत होती व महाराजांच्या सांगण्यावरून भक्त मंडळींनी दादरला जागा बघायला सुरुवात केली. त्यांना एक बंगला सापडला तो भुताटकीचा व तीन खुनी बंगला म्हणून ओळखला जात असे. मंडळींनी ही गोष्ट महाराजांस कळविली. महाराज म्हणाले, काही हरकत नाही आपण तेथे समर्थांची स्थापना करुन सर्व भुतांना मुक्त्ती देऊ. आपण परत जावे व कुलुप उघडून आत अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध येईल, तो असा आल्यास भाडे देऊन ताबडतोब बंगला ताब्यात घ्यावा. वरील मंडळींना कुलुप उघडल्यावर अत्तराचा व उदबत्तीचा सुगंध आला व त्यांनी महाराजांचे सांगण्यावरुन बंगला भाड्याने घेतला. हा भाड्याने घेतलेला बंगलाच आपल्या आजच्या दादर मठाचे स्थान आहे !
हे जीवन स्वामीमय रहावे
|| स्वामी हो ||