
गिरगावकरांचे लाडके ज्येष्ठ समाजसेवक, मार्गदर्शक श्री. शरद (भाई) शंकर विचारे अनंतात विलीन !!.
गिरगावकरांचे लाडके ज्येष्ठ समाजसेवक, मार्गदर्शक श्री. शरद (भाई) शंकर विचारे अनंतात विलीन !!.
(वार्ताहर - अभिजित पेठे) नायर रुग्णालयात गेली ५ दिवस श्री. शंकर विचारे यांच्यावर उपचार सुरु होते. वयाच्या ७६ व्या वर्षी त्यांचे करोनामुळे निधन झाले.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, फणसवाडी वेल्फेअर सेन्टरचे संस्थापक, बाल उत्सव सार्वजनिक मंडळाचे ते गेली २५ वर्षे अध्यक्ष होते. अतिशय शांत, संयमी असलेले भाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक कार्यात पेरले. १९७२ साली त्यांनी पहिल्यांदा मुंबई महापालिकेची निवडणूक खेतवाडी मधून स्व. कामगार नेते श्री. शरद राव यांच्या विरोधात अपक्ष लढवली होती. त्यानंतर २००२ व २०१२ साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती. भाईंच्या मृदू स्वभावामुळे त्यांची सर्व पक्षीय नेते /पदाधिकारी यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय जीवनापेक्षा ते सामाजिक कार्यात जास्त रमायचे. त्यांनी J. P. आणि SEM म्हणून तीनशेपेक्षा जास्त खटल्यात पोलिसांना मदत केली होती. त्यात माजी महापौर खून खटला, मुंबई बॉम्बस्फोट, अजमल कसाब अशा नावाजलेल्या खटल्यांचा समावेश होता.
भाईंशी माझे कौटुंबिक संबंध होते. १९७८ साली माझे आई वडील वास्तव्यास असलेल्या ग्रांट रोड येथील इमारत धोकादायक अवस्थेत होती. भाईंनी त्यावेळी पाठपुरावा करून त्यांना गोरेगाव येथील संक्रमण शिबिरात घर मिळवून दिले होते . त्यावेळी माझा जन्मही झाला नव्हता.१९९९ साली म्हाडाने आम्हाला घर रिकामे करण्याची नोटीस धाडली त्यावेळी आई -वडील या जगात नव्हते. त्यावेळी संपर्कात असलेल्या काही नातेवाईकांकडून भाईंबद्दल समजले आणि त्यांची भेट घेतली.भाईंनी आमच्यासाठी म्हाडा, महानगरपालिका, मंत्रालय अशा सर्व कार्यालयात मला घेऊन खेपा घातल्या. त्यावेळचे राज्यमंत्री श्री. रोहिदास पाटील यांची आम्ही भेट घेतली होती.भाईंच्या सांगण्यावरून एका बाजूला न्यायालयात म्हाडा विरोधात खटला दाखल केला तर दुसऱ्या बाजूने ग्रांट रॉड येथील घराचे वेगवेगळे पुरावे गोळा करत होतो. शेवटी २००५ साली न्यायालयीन खटला आम्ही जिंकला.
सरकारी यंत्रणेसोबत कसा संघर्ष करावा हा अनुभव भाईंमुळे मिळाला. शेवटच्या क्षणी त्यांची भेट घेता नाही आली हे शल्य कायम मनात बोचत राहील!
भाई मामा आपण सदैव स्मरणात राहाल.
भावपूर्ण श्रद्धांजली !