
लोअरपरळ ची दादासाहेब खामकर मंडई पुन्हा गजबजणार !
जवळपास १९५० सालापासून अस्तित्वात असलेली मुंबईतील लोअरपरळ विभागाला, गिरणगावाला आधार देणारी साथ देणारी रेल्वे स्थानकाजवळ असलेली प्रो. दादासाहेब खामकर मंडई तदकालीन दिवंगत आमदार दत्ताजी नलावडे यांच्या संकल्पनेतून बीएमसी व म्हाडा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते ३० वर्षांपूर्वी पुनर्विकासीत केली होती. त्याठिकाणी जुनी मंडई पाडून त्रिशूळ इमारतीचे काम सुरू केले व व्यापा-यांना अन्य ठिकाणी आजूबाजूला तात्पुरता हलविण्यात आले.
त्रिशूळ इमारतीत तळ मजल्यावर मंडई व वरच्या मजल्यांवर बीएमसी व म्हाडाची घरे असे त्यात प्रयोजन केले गेले, काम पूर्ण झाल्यानंतर, तळ मजल्यावर दादासाहेब खामकर नव्याने सुरू झाली. परंतु तळमजल्या वरील मंडई ची जागा गैरसोयीची व अडचणीची असल्याने व्यापाऱ्यांनी नाईलाजाने लोअर परेल रेल्वे स्थानकाच्या भिंतीला लागून धंदे सुरू केले.
मच्छी मार्केट तालचेकर वाडी शाळे पुढे सुरू झाले व इतर दुकाने त्रिशूल बिल्डिंग १ व २ समोर.
सर्वच आलबेल होतं त्यात मासळी बाजार, मटण बाजार, मोबाईलची दुकाने, मसालेवाले, किराणावाले, कपडे, खेळण्याची दुकाने सगळेच सुखात होते.
परंतू लोअरपरळ उड्डाण पूल तीन वर्षापूर्वी धोकादायक असल्याचे जाहीर झाल्यानंतर, त्याचे पुनर्बांधणीचे काम सुरू झाले. त्यामुळे लगत असलेल्या मंडईच्या धंदेवाईकावर गदा आली व सर्वच एकदम बेरोजगार झाले.
स्थानिक व्यापा-यांनी हे प्रकरण माजी महापौर व नगरसेविका- स्नेहल आंबेकर यांची भेट घेऊन चर्चा केली. स्नेहल आंबेकर यांनी या प्रकरणी पाठपुरावा करून महानगर पालिका आयुक्त यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करून मंडई सुसज्ज करून देण्याचा निश्चयच केला.
पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दिल्यानंतर आता त्रिशूळ इमारतीखाली तळमजल्यावर दुकानांच्या पुनर्बांधणीचे काम जोमाने सुरू आहे.
त्यात जिथे काम तिथे वाद !
त्रिशुळ इमारतीतील काही बाह्य दुकानांची विजेची केबल मंडईतुन जात असल्याने काही तांत्रिक अडचणीमुळे त्रिशुळ इमारतीतील बाह्य दुकानदार व मंडई व्यापारी यांच्यात वाद चालू होता. नगरसेविका आंबेकर यांनी मध्यस्थी करून सकारात्मक चर्चा करून समेट घडवून आणली.
आता याठिकाणी नव्याने दादासाहेब खामकर मंडई गजबजणार आहे.