
पत्रकारांवरील हल्ले थांबणार कधी ?
दिनांक 3 डिसेंबर रोजी वसई तालुक्यातील काही संपादक कामानिमित्त बाहेर जात असताना कामन रोड, कुरमुरा पाडा परिसरात अनधिकृत बांधकाम त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे रस्त्याच्या कडेला दोन्ही गाड्या उभ्या करून उपस्थित पत्रकार वृतांकन करण्यास गेले असता दोन व्यक्तीनीं छायाचित्र घेऊ नका असे सांगितले. परंतु फोटो काढणे आमचं काम आहे असे सांगून छायाचित्र घेऊन निघाले असता मुख्य रस्त्यावर गाडीच्या दिशेने जात असताना काही तीन अज्ञात व्यक्ती गाडी पर्यंत आले परंतु आम्हाला ह्या विषयावर चर्चा करायची नाही असे सांगून परतीच्या रस्त्यांनी निघत असता भर रस्त्यात काही इसम मोठे दगड व लादीचे तुकडे घेऊन रस्त्याच्या मध्ये उभे राहिले व गाडी बाजूला थांबवण्यासाठी सांगितले. गाडी थांबवता क्षणी गाडीवर ह्या समूहांनी भीषण हल्ला केला. यावेळी पंचवीस ते तीस लोकांचा समूह, हल्ला करण्यात सहभागी होता. यावेळी येथे गाडीवर धावून आलेल्या त्या अज्ञात लोकांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्या समूहाला तोंड देणं अशा वेळी शक्य नव्हतं. त्यामुळे पत्रकार काहीच करू शकले नाहीत काही अज्ञात महिला देखील ह्या समूहात उपस्थित होत्या व अनधिकृतपणे बांधकाम करणाऱ्या सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून हा गंभीर हल्ला करून पत्रकारांना मारहाण करण्यात आली. यावेळी एका इसमाने जबरदस्तीने एका संपादकांच्या गळ्यातील चेन आणि मोबाईल रस्त्यातच फोडला. त्याचबरोबर उपस्थित महिलांनी पत्रकारांना शिव्या देऊन मारहाण करण्यास सुरुवात केली सदर घटना इतकी भयानक होती की ह्या परिसरातील तसेच ह्या रहदारीच्या रस्त्याने प्रवास करणाऱ्या लोकांसह सर्व आजूबाजूची लोकं जमा झाली होती.
कशी तरी पत्रकारांनी तिथून सुटका करून घेऊन पोलीस वालीव स्टेशन गाठले. सदरचे हल्लेखोर हे गुंड प्रवृत्तीचे असून संपादक तसेच पत्रकारांनी वालिव पोलीस स्टेशन येथे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
भारतीय दंड संहिता १८६० – १४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६,३९५ अशाप्रकारे एफ आय आर दाखल करण्यात आला आहे.
वसई तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहून वालिव पोलीस स्टेशनमध्ये आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच कामण कुरमुरा पाडा येथे होत असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी आयुक्त, प्रभारी सहआयुक्त यांना पत्र देण्यात आले असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे. भविष्यात वसई तालुक्यात पत्रकारांवर झालेले कोणतेही हमले खपवून घेतले जाणार नसून यासाठी भूमाफियांविरुद्ध आंदोलन छेडले जाणार असून जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस आयुक्त, गृहमंत्रालय, मुख्यमंत्री यांच्याशी पत्रव्यवहार करून भूमाफियांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. सदर घटनेची वालिव पोलीस स्टेशनने घटनास्थळी पाहणी करून दोन आरोपीना अटक केली आहे. तसेच ह्या जमावात सामील असलेल्या १५ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत वालीव पोलिसांच्या योग्य निर्णयामुळे तालुक्यातील अनेक पत्रकारांना अखेर न्याय मिळाला. पोलिसांनी केलेल्या सहकार्यामुळे सर्व पत्रकारांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.