
अखेर त्या सुरक्षा रक्षकांना न्याय मिळाला !
(ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी कामगार नेते लक्ष्मणराव भोसले व हनुमंतराव सुरवसे यांनी सुरक्षा रक्षक मंडळ ते मंत्रालयापर्यंत विविध पातळीवर पाठपुरावा केल्यामुळे सुरक्षा मंडळाच्या ८५ सुरक्षा रक्षकांना अखेर न्याय मिळाला आहे.
सुलझेर पंप इंडिया लिमिटेड दिघा नवी मुंबई या सुरक्षा रक्षक मंडळाच्या नोंदणीकृत आस्थापने मध्ये मंडळाचे ८५ सुरक्षारक्षक काम करतात. परंतु आस्थापनेने त्यापैकी २२ सुरक्षारक्षक कमी करून ग्रुप फोर या एजन्सीचे सुरक्षारक्षक बॉडीगार्ड म्हणून ठेवले होते. या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी सुरक्षा रक्षक युनियनचे अध्यक्ष हनुमंतराव सुरवसे तसेच महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मणराव भोसले यांनी लेखी आक्षेप घेऊन कंपनी वर न्यायालयात केस दाखल करण्यास भाग पाडले. तसेच एवढ्यावरच न थांबता मंडळाच्या काढलेल्या सुरक्षारक्षकांना परत त्याच आस्थापनेमध्ये वितरीत करण्यास सांगितले.
मंडळाच्या अध्यक्षांनी ही मागणी मान्य करून कमी केलेल्या सुरक्षा रक्षकांना त्याच आस्थापनांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला व त्यांना न घेतल्यास त्यांचा पगार वसुली ची प्रक्रिया करण्यास सांगितले. सहा महिन्यापासून मंडळ व शासनास लेखी स्वरूपात निवेदन देऊन या कमी केलेल्या सुरक्षारक्षकांना न्याय देण्यासाठी या संघटना लढत आहेत.
मंडळाचे अध्यक्ष आडे तसेच मंडळाचे निरीक्षक भगत यांनी याप्रकरणी मोठे सहकार्य केले.