नादान आई व रगेल बाप !!

नादान आई व रगेल बाप !!

     (ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) मुल होत नाही म्हणुन नवस करणारे, लाखो रुपये खर्चकरुन हॉस्पिटलचे उंबरठे झिजवणारे, दत्तक मुल मिळत नाही म्हणुन नाराज असणारे असे अनेक आईवडिल आज मुल होत नाही म्हणुन दु:खी आहेत. तर दुसऱ्या बाजुला असेही आईवडिल आहेत की त्यांना मुल नको आहे. मात्र या सर्व वास्तवाच्या विरुध्द काही आईवडिल असेही आहेत की, त्यांना झालेले बाळ नको असते. अशाच एका दोन महिन्याच्या मुलीचा गळा दाबुन ठार करुन कचरा भरतो तसे त्या चिमुकलीला एका पिशवित भरुन पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या एका रिक्षात फेकुन देणारया 'नादान' आईची व 'रगेल' बापाची ही कहाणी.

        मोकळ्या मैदानात एक रिक्षावाला आपली रिक्षा पार्क करुन रात्री घरी गेला होता. रिक्षा पार्क केलेली जागा फार वर्दळीची नव्हती. सुमसाम ठिकाणी ती उभी केली होती. बांद्रे येथील कुरेशी नगरच्या मोकळया मैदानात ती रिक्षा पार्क केली होती. सकाळी तो नेहमीप्रमाणे रिक्षा काढायला आला असता त्याला रिक्षात एका पिशवी मिळाली. घाबरत घाबरत त्याने पोलीसांना फोन केला  पोलीस घटनास्थळी आले व दोन महिन्याची मुलगी त्यांनी ताब्यात घेतली, पंचनामा सुरु झाला, अहोरात्र तपासकार्य कार्य सुरु झाले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ, निरीक्षक मनोहर धनावडे यांच्यासह  उपनिरीक्षक चेतन पचेरवाल, पो. निरीक्षक प्रमोद कुंभार, अशोक पाटील, आनंद निकम यांनी रात्रीचा दिवस केला. डॉकटरांचा अहवाल व इतर तपास प्रक्रिया पुर्ण झाल्यावर या मुलीची गळा दाबुन हत्या झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.

      आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे तिसरा डोळा, रिक्षा पार्कींग परिसरातील पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज व आदी महिती आजुबाजुच्या परिसरात  पोलीसांनी आपले खबरे कामाला लावले, समांतर तपास करत  गुन्हे शाखेच्या पथकानेही मोठी कामगीरी पार पाडली. दोन महिन्याची मुलगी आजुबाजुच्या रुग्णालयात जन्माली आली आहे का? याचा शोध पोलीसांनी घेतला. घरातच बाळंतीण झालेल्या महिलांची माहिती घेतली. तर अंदाजे अडिच ते तीन हजार मुली जन्मल्या असल्याची आकडेवारी समोर आली. या सर्व मुलींच्या घरी जावुन प्रत्यक्ष भेटुन, खबरी कामाला लावुन पोलीसांनी तपासाला वेग दिला. वेगवेगळी पथके तयार करुन तपास सुरु झाल्यामुळे काहीतरी नककी माहिती मिळणार असे पोलीसांना वाटत होते. मात्र यश येत नव्हते. मात्र पोलीसांनी जिदद कायम ठेवली.  फुटपाथवर राहणारे लोक आता आपण पाहिले पाहिजेत असे ठरवत फुटपाथवर पोलीसांनी लक्ष केंद्रित केले. भिकारी, गर्दुल्ले, पारधी, आदी घटकांची माहिती घेत शोध सुरु झाला व अखेर पोेलीसांना यश आले.

       फुटपाथवरील एका भिकारयामुळे दोन महिन्याच्या या मृत मुलीच्या मारेकरयापर्यंत पोलीसांचा तपास गेला. तो भिकारी म्हणाला, इथे एक अल्पवयीन मुलगी बाळंतीण झाली होती. तिच्याकडे एक बाळ होते मात्र आता ते तिच्याकडे दिसत नाही. सापळा रचुन पोलीसांनी त्या मुलीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. व तपासाअंती तिने सर्व कबुल केले.

       मी  फूटपाथवर राहत होती माझे  कुटुंबही फुटपाथवर राहायचे, मला त्यांनी एका कारणामुळे घराबाहेर काढले, मी फुटपाथवर राहु लागली, त्यावेळी एका तरुणाने मला प्रेमप्रकरणात फसवले प्रेमप्रकरणात मी गरोदर राहिली. मी बाळंतीण झाले. मात्र प्रियकराने माझ्यावर संशय घेत या मुलीचा मी बाप नाही. कुणाची मुलगी आहे ही, असे बोलु लागला. त्यामुळे मी वैतागले ! आता या मुलीचा संभाळ कसा करायचा? तिला कसे वाढवायचे? आदी प्रश्न मला सतावु लागले. म्हणुन मी तिचा गळा दाबुन मारुन टाकण्याचा निर्णय घेतला.

     पोलीसांची जिदद व अहोरात्र सुरु असणारा पोलीसांचा तपास त्या दोन वर्षाच्या मुलीला न्याय देवुन गेला. नकोशा असणारा  अशा अनेक मुली हे जग पाहण्याअगोदरच कचरयाप्रमाणे फेकल्या जात आहेत. भितीपोटी, गरिबीमुळे, इज्जतीमुळे, मुलगा पाहिजे मुलगी नको अशा कारणामुळे कायदयाचा भंग करत गर्भपात होत आहेत. अशा घटना होवु नये म्हणुन सरकार कि समाज नेमके कोण कमी पडतेय. याचा विचार दोन महिन्याच्या मुलीच्या हत्येमुळे समोर आला आहे. हत्या झालेल्या या मुलीच्या जागी मुलगा असता तर त्या मुलीचा या नादान आइने गळा दाबला असता का? हा ही एक प्रश्न शिल्लक राहतोयच.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे

Most Popular News of this Week