
स्वयंस्फूर्तीने आर्थिक मदत जाहीर व्हावी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसच्या वाढत जाणाऱ्या प्रसारा विरुद्ध लढण्यासाठी देशातील जनतेला आर्थिक मदत करण्याचे आव्हान केले आहे. त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत टाटा उद्योग समूहाने ५०० कोटी रु ची पंतप्रधान साहाय्य निधी योजनेत मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे काही बॉलिवूड कलाकारांनी, काही देवस्थानांनी ही मदत दिली आहे. त्यांचे आभार मानताना अर्थमंत्र्यांनी गरीब कल्याण योजने तर्फे गोर गरिबांसाठी १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेज जाहीर करून ८० कोटी गोर गरिबांना दिलासा, बँक कर्जाचे हफ्ते लांबणीवर, नवीन कर्ज स्वस्त करण्यात आले आहे. पेन्शनरांना ३ महिने ॲडव्हान्स पेन्शन इत्यादी आर्थिक साह्य करून अर्थमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले आहे. याकरीता देशाला पैश्यांची गरज आहे. नाट्यकर्मी प्रशांत दामले यांनी बेकस्टेज च्या कामगारांना आर्थिक साहाय्य केले आहे. लोकप्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्ते, स्थानिक गरीब जनतेला जेवण, जेवणाची पाकिटं देऊन खारीचा वाटा उचलत आहेत तरी परदेशी कंपन्यांचे अब्जावधी रुपयांचे गुंतवणूकदार वकील, इंजिनियर, बिल्डर, आयकर सल्लागार, सेलीब्रीटीज, क्रिकेटर, लोकप्रतिनिधी इ इ नी स्वयंस्फ्रूर्तीने आर्थिक मदत जाहीर करावयास हवी.
सन १९६२,१९६७ ला चीन बरोबर, पाकिस्तान १९६५,१९७१,१९९९ कारगिल हे युद्ध प्रत्यक्ष सीमेवर झाले. तेथे आपले जवान लढत असताना त्यांच्या मदती करीता सर्व सामान्य नागरिकांनी, स्त्रियांनी आपले मंगळसूत्र दिले आहेत. रस्तोरस्ती प्रभात फेऱ्या काढून डब्बे फिरवत पैसे गोळा केले आहेत. सन १९६२ रोजी "ओ मेरे वतन के लोगो" अशी लता मंगेशकर यांनी आर्त हाक मारली होती. या वेळी हिमालयाच्या साथीला त्यावेळचे मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण धावून गेले होते. आणि आता प्रत्यक्ष आपल्या देशांतर्गत चीन चा करोना व्हायरस पसरत असतांना, पंतप्रधान नरेंद्र यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे खंबीरपणे सहकार्य करीत आहेत. आताच्या करोना व्हायरस ची लढाई ही प्रत्यक्ष आपल्या दारात आली आहे. तिच्याशी मुकाबला करण्यासाठी घरातूनच लढायचे आहे. सर्व स्वच्छतेचे शासनाने दिलेले नियम पाळायचे आहेत. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबबदारी घेतो. आणि आपल्याला करोना विरुद्ध विजय मिळवायचा आहे. त्याकरीता आर्थिक मदत पाहिजे आहे. सर्वांनी स्वयंस्फूर्तीने सहकार्य करावे.
हम होंगे कामयाब.