व्यथा कोवळ्या प्रेमभंगाची !!
उदास_आभाळ
व्यथा कोवळ्या प्रेमभंगाची......
या उदास आभाळाची कविता करणे मी सोडून दिलय, कारण त्यानेही धोका दिलाय मला माझ्या प्रेयसी सारखा आणि उध्वस्त केले माझं जगणं भूकंपातल्या घरासारखं.... डगमगतंय अस्तित्व माझं लटकलेल्या तुळवी सारखं ..
मला आठवतंय ते माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम, माझ्याच नकळत ती माझ्या मनाच्या जवळ आलेली ते बंद ओठातलं बोलणे त्या फुललेल्या कळी प्रमाणे हासणे. तो माझ्या मनाला केलेला चंदेरी स्पर्श अजून आठवतोय आणि रडवतोय ही !
माझ्या मनातलं विस्कटलेलं घरटं बांधलही नव्हतं अजून त्याला विश्वासाच्या धाग्यांनी स्पर्श झाला होता तो चंदेरी, जाणलं होतं प्रेम मी हलक्याच पावलांनी, वाटलं होतं जगावं आयुष्य प्रेमाने बांधलेल्या धाग्यात ती बंधने असावे रेशमाची आणि पाश गुंतलेल्या फुलांशी, पावसाचा पहिला सुगंध मातीच्या मनातील गंध या वाऱ्याच्या वेगाने जाऊन सांगावा तिच्या कानात, दूर कुठेतरी एकांतात दिलेली वचने ती विश्वासाशी तिनेच करून दिलेली ओळख आणि त्याच विश्वासाला तडा गेला, झाली देहाची लाहीलाही अन् केली वचनांची होळी आणि मिळून जाळली ती वचने सारी जी पाहिली होती तिच्या संगे, माझं मन तिने इतक्या सहजतेने तोडलं त्या निष्पाप चेहऱ्या आड दडलेल्या क्रुरतेने.
वेडाऊन जायचो मी तिची आठवण दाटल्यावर .... रक्तबंबाळ झालेल्या काळजावर तिच नाव अंधुकस उरलं होतं, प्रकाशातही माझे पाय चाचपडत होते आणि उरल्या आठवणी ही आक्रोश करीत होत्या तिच्यापासून दूर जाण्याचा, काय चुकलं होतं माझं निस्सीम प्रेम निष्पाप भावनेने सुंदर स्वप्न पाहणे हा गुन्हा? माझ्या स्वभोवतालचा अंधार किती गडद होता याची जाणीव ही तिला का नव्हती ? माझ्या सुखाला पायदळी तुडवीत असताना माझ्या प्रेमाची हलकीशी जाणीव तिला का झाली नाही ?
तिच्या सौंदर्यावर माझी नजर कधीच फिरली नव्हती, पण मी तिला इतक्या सहजतेने विसरू शकत नाही जितक्या सहजतेने ती बदलली ! माझ्या सुंदर स्वप्नांशी केलेला अघोरी खेळ, कधी वाटतं हा सारा नशिबाचाच भाग असतो, मग प्रेम काय असतं? नशिबापुढे प्रेमाने दरवेळी झुकायचं ?
पण यावेळी खेळ नशिबाचा नव्हताच तर सौंदर्याच्या मस्तीत येऊन एखाद्याच्या भावनांशी केलेल्या जीवघेणा प्रयोग होता, मला माझ्या प्रेमाचा साथीदार कधी मिळालाच नाही, माझ्या हातून कधी दुष्कृत घडले नसले तरी सुद्धा नीयतीने सुड उगवलाच.
माझ्या प्रवासाची सुरुवात जरी शापित झाली असली तरीसुद्धा कोणतीतरी पौर्णिमा माझ्या अंगणातला प्रकाश पाझरवेल, पुन्हा लख्ख प्रकाश पडेल ही, पण माझ्या भावनांशी झालेला अघोरी खेळ प्रकाश असूनही अंधारात हरवलेले क्षण जगू शकलो नाही ही खंत राहील...
(राहुल लोखंडे)