प्रेम आणि आकर्षण .....
प्रेम आणि आकर्षण अतिशय गहन विचार आहे, बहुतांश लोक प्रेमात पडतात पण त्यांच ते प्रेम म्हणजे नेमक काय हे कोड अजूनही उलगडत आहे. आकर्षण आणि प्रेम यातील अंतर काय? त्यावर खूप जण प्रतिक्रिया व्यक्त करतात.
त्यांच्या सर्वांच्या मताचा आदर ठेऊन (खंडन कुणाचेच नाही... कारण मला माहीत आहे की, सत्य हे सापेक्ष असतं) या विषयावर मी आज माझं प्रामाणिक मत व्यक्त करणार आहे.
कदाचित माझी मांडणी समजायला थोडी किष्ट वाटेल मात्र ती सविस्तर असेल.... जर पेशन्स ठेऊन लेखाचं पूर्ण वाचन केलं तर, तर प्रेम आणि आकर्षणाच यथार्थ स्वरुप समजेल हे मात्र नक्की.
आकर्षणाची व्याख्या समजावून सांगताना माझा base हा जैविक, आणि भौतिकशास्त्र असेल तथापि प्रेम समजावून सांगताना मी आजवरचे संत, भक्त, दार्शनिक, तत्त्ववेत्ते आणि ज्ञानी महापुरुषांचा आधार घेणार आहे. मात्र दोन्ही गोष्टींचे विश्लेषण हे तर्क संगत राहील याची मी निश्चित काळजी घेईन.
स्त्री पुरुष आकर्षण हे पूर्णतः देहिक गोष्ट आहे. ठराविक वयात आल्यावर हार्मोन्स उड्या मारू लागतात आणि अचानक त्याच्या तिच्या शरीरावरचा किंचित उभार देखील एकमेकांना जन्नत वाटू लागतो. शरीरात होणाऱ्या या रासायनिक बदलला आपण प्रेमाचं नाव देतो आणि यावर मग शेकडो हजारो शेरो शायऱ्या, कविता लिहिल्या जातात. पिक्चर निघतात.
एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, प्रकृतीचा गुणधर्म प्रसारण पावणे आहे. प्रजनना द्वारे सृष्टीची गतिशीलता आणि अस्तित्व अबाधित ठेवणे हा तिचा उद्देश असतो. त्यामुळे प्रकृती द्वारे आपल्या मनात naturally आकर्षण निर्माण केलं जातं.
आकर्षणाला नैतिकता, एकनिष्ठता, समर्पण, निस्वार्थ, निरपेक्ष प्रेम, उदात्त भावना या गोष्टींचं काही घेणं देणं नसतं. या बाबतीत ते उदासीन असतं. त्यामुळे अनेकांबद्दल आकर्षण निर्माण होऊ शकतं doesn't matter तुम्ही married आहात की unmarried. भोगी, विलासी आहात की साधू संन्यासी.
मात्र लोक लज्जेपायी अथवा मर्यादेपायी या गोष्टी बोलल्या जात नाहीत. मात्र सत्य स्वीकारायची हिंमत असेल तर आपलं मनच याला प्रमाण आहे आणि साक्ष आहे. आकर्षण हे केवळ शारीरिकच असतं असं काही नाही. ते कला गुणांचं देखील असू शकतं. पण कला गुण देखील त्रिगुणात्मक प्रकृतीचाच भाग असल्याने त्यात विशेष असं काही नाही. म्हणजे शारीरिक आकर्षण निम्न दर्जाचं आणि गुणांच आकर्षण उच्च दर्जाचं हा केवळ भ्रम आहे. कारण प्रकृतिचा तळ एक आहे आणि तो सपाट आहे. तिथे खाली वर असं काही असत नाही. मात्र प्रकृतीत शारीरिक आकर्षण हेच जास्त प्रबळ आहे हे मात्र नक्की. उदाहरण द्यायचं झालं तर लग्न जुळताना आजही देहच पाहिला जातो. मुलगी/मुलगा हेच पाहतात की समोरची व्यक्ती दिसायला कशी आहे. नाकी डोळी उंची रंग रूप कारण स्त्री ला हवा असतो पिळदार शरीरयष्टी चा देखणा पुरुष आणि पुरुषाला हवी असते भरगच्च देहाची सुंदर स्त्री, कारण आपण जन्माला जनावर म्हणूनच येतो, ही गोष्ट निराळी की नंतर आपण आपल्यातील चैतन्याला किती उंची वर नेऊन ठेवतो असो, आता प्रेम पाहुया.
प्रेम विषयाला स्पर्श करण्या अगोदरच एक गोष्ट क्लिअर करतो की, एकमेकांना खुश ठेवणं म्हणजे प्रेम नाही... तू मला खुश ठेव, मी तुला खुश ठेवतो. तू मला सुख दे. मी तुला सुख देतो, याला प्रेम म्हणत नाही. नाही. नाही....!
ज्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं त्याच्याबद्दल एकाच उद्दत्त भावनेने मन भरलेलं असतं की याला मुक्त कसं करू याचं कल्याण कसं होईल.
याच्या आयुष्यातून संपूर्ण दुःख निवृत्ती कशी होईल आणि याला आझादी कशी प्रदान करता येईल आणि असं प्रेम कुणीही करू शकत नाही. असं प्रेम करण्यासाठी फार मोठी पात्रता, योग्यता लागते. कारण जो प्रेमपात्र असतो त्याला हे माहित असतं की जीवनाचं अंतिम ध्येय हे आनंद प्राप्ती आहे आणि आनंद हा कायम मुक्तावस्थेतच असतो.
आपल्याला घेऊन थेट आनंद तत्त्वाला भिडवेल, त्यात आपल्याला विलीन करेल तोच आपला खरा हितैशी, खरा प्रेमी मग तो आपला बाप असू शकतो आई, मित्र, मैत्रीण, बहीण, भाऊ, गुरू, पती, पत्नी, आज्जी, आजोबा कुणीही असू शकतो.
खरा प्रेमी कोण हे मी सांगितलं. आता प्रेमाची अंतिम व्याख्या सांगून थांबतो जे आत्म्याशी केलं जातं ते आणि तेच प्रेम आहे. बाकी सर्व मोह, माया, आसक्ती, आकर्षणाचं जंजाळ आहे. दुसरं काही नाही. आत्म्याच्या मुक्तीसाठी, उद्धरासाठी तळमळत वाटणं.. आणि त्या दिशेने प्रयत्नशील राहणं हेच प्रेम आहे आणि हे प्रेम जेव्हा ओसंडून वाहू लागतं तेव्हा ते करुणेच्या रूपाने जगावर, मानव जातीवर, प्राणीमात्रांवर आणि ह्या संपूर्ण चराचर सृष्टीवर अमृताच्या सरी बनून बरसू लागतं.
_✍️ध्रुव