कातरवेळी
कातरवेळी .....
पुन्हा पुन्हा का येते आहे तुझी आठवण कातरवेळी
रोमांचित बघ होउन जातो देहाचा कण कातरवेळी
तुझे लाजणे तुझे हासणे नजरेचा तो बाण सोडणे
जिवावरी बघ उठती माझ्या हळवे ते क्षण कातरवेळी
असा भास का होतो कायम आसपास रेंगाळत आहे
कानामध्ये सदा गुंजते छनछन पैंजण कातरवेळी
वय सरले पण कधी न सरला खोडीलपणा हा सखे तुझा
विरह घडींनी घट भरलेला दिलाय आंदण कातरवेळी
तू गेली अन् वैराग्याला खरेच वाटे हवाहवा मी
तुझ्याविना मज नको सुखाची कसली पखरण कातरवेळी
बबन धुमाळ, वाघोली, पुणे
मो नं 9284846393