नो हावळा, नो हुरडा"......

नो हावळा, नो हुरडा"......

       गुरं ओढ्याला मोळात सोडून, डोहात दोन सुळक्या मारल्या. डोहातून वर आलो तेव्हा सपाटून भूक लागलेली. बांधाआडून लपतछपत जाऊन शेजारच्या शेतातून हरबरा चोरुन आणला.. बाजूच्या वघळीत घाटे खाऊन तिथेच टरफलं पुरुन टाकली.. हरब-याचे शिल्लक राहिलेले डहाळे गाईला चारले. 

     भुकेल्या अवस्थेत तो हरबरा एवढा आवडला की, रोज चोरायचा अन् खायचा असा निर्धार करुन मगच घरी आलो. दुसर्‍या दिवशी काडेपेटी खिशात घेऊनच गुरांमागे गेलो. आज हावळा भाजून खायचाच असे ठरले.. गुरं ओढ्यात सोडली आज डोहातील शांत स्वच्छ नितळ पाणी नको वाटत होते. ओढ्याच्या काठावर असलेल्या कावळीच्या जाळीआडून त्या हरब-याच्या शेतात लक्ष वारं ठेवून होतो. आज हावळा घायला भेटेल की नाही असे वाटत होते. कारण शेजारी असलेल्या शेतकऱ्याची ज्वारीची काढणी सुरु होती. चार पाच माणसं भलरी म्हणत ज्वारी काढत होते. ते घरी जायची वाट पहात बसलो पण ते काही घरी जाईनात. दुपार झाली, काढणी बंद झाली, आम्ही खूश झालो. आता हळूच जाऊन हरबरा आणू अन् मनसोक्त हावळा खाऊ असा विचार मनात आला. तोंडाला पाणी सुटले. भूक आ करुन आम्हाला हिणवत होती. पण माणसं घरी गेलीच नाहीत. तिथेच आंब्याच्या झाडाखाली भाकरी खाऊन झोपी गेली. उन्हं कलल्यावर पुन्हा उठली अन् ज्वारी काढायला सुरु केलं. लय राग आलेला पण काय करणार... 

       पोटात भुकेची जत्रा भरलेली अन् आमची अवस्था त्या जत्रेत मायबापापासून दुरावलेल्या लेकरासारखी हतबल.. माणसं घरी जायची वाट पहात तिथेच मोळात जनावरं आडवून धरलेली.. दिवस कलला.. गुरं हंबरत सैरभैर होऊन ओढ्यातून बाहेर आली.. जी सुसाट धावत सुटली ती थेट घरी.. जनावरं बांधली.. मग घरात जाऊन टोपल्यात शिल्लक असलेली चतकोर भाकरी मटामटा मटकावली.. पाणी पिऊन अंगणात आलो.. पोरांबरोबर गाण्याच्या भेंड्या खेळत बसलो.. मस्त धमाल मस्ती सुरु होती. तेवढ्यात एकजण म्हणला आज हुरडा खायचा का.. संध्याकाळी हुरडा भाजूयात.. आम्ही सगळेच तयार झालो.. घरचे ओरडतील म्हणून आम्ही घरापासून थोडं दूर जाऊन हुरडा पार्टी करायचे ठरवले.. घरुन निघताना एकजण हळूच कानात बोलला.. ती ज्वारी काढणारी माणसं आता गेली असतील की घरी..जायचं का हरबरा आणायला.. मग सगळ्यांचा निर्णय झाला.. आज हुरडा रद्द.. हावळा खायचा.. चला म्हणून तशा अंधारात ठेचकाळत हरबरा चोरायला सगळेच निघालो.. कुणाला कळू न देता पोटभर हावळा खायचे ठरले.. गेलो एकदाचे ओढ्यापल्याड.. जवळपास एक कडाप होईल अशा मापात हरबरा उपटला.. परत आलो.. आगटी करुन हावळा भाजायला सुरुवात केली.. खायला सुरुवात केली तोपर्यंत ज्याच्या रानात जाऊन हरबरा आणला होता तो शेतकरी आमच्या घरी जाऊन आम्ही दररोज चोऱ्या करत असल्याचे आमच्या घरातल्यांना सांगत आमचा उद्धार करत होता.. मग काय आमच्या घरचे त्याचा वचपा काढायला दबक्या पावलाने आम्ही कुठे आहोत आणि काय करतोय ते पहायला आले.. पहातायत तर जवळपास एका कडापाच्या मापाचा हरबरा शेजारी, समोर आगटी अन् हावळा भाजायचा कार्यक्रम सुरु.. आम्ही आगटीच्या सभोती गोल करुन बसलेलो.. आमच्या मागे त्या शेतकऱ्यासह आमच्या घरातील सर्वांनी वेढा टाकलेला.. पुढे काय झाले ते तुम्हाला कशाला सांगू आता.. ते त्या पेटलेल्या आगटीसारखे लाल होऊन आमच्या घरचे आमच्यावर तुटून पडले.. आमची अवस्था तर गळून आगटीत पडलेल्या अन् जळून खाक झालेल्या हरब-याच्या घाट्यासारखी झाली.. तेव्हापासून एक धडा पक्का शिकलो..चोरी लय वंगाळ असतीय बा.. यापुढे "नो हावळा नो हुरडा..." 

--हनुमंत चांदगुडे

सुपे, ता. बारामती 9130552551


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week