आईचे पत्र - मायेचे छत्र भाग -२
१/११/२०२३
प्रिय ओम,
आज तुझ्या वाढदिवसाला भेटस्वरूप पत्र लिहित आहे. हे पत्र तुला कायम अनमोल ठेवा वाटावे असेच आहे.
तुझी बारावीची परीक्षा पार पडली आणि प्रचंड मोठे संकट संपूर्ण जगावर आले. दुसर्याच दिवशी करोनामुळे देशभर लाॅक्डाउन जाहिर झाला. खाण्याचे जिन्नस अचानक बाजारातून गायब झाले. वर बाहेर पडण्याची भिती....बारावीची तुझी परीक्षा झाली होती तरी खूप मुलांची बाकी राहिली. कुणाची एक — दोन विषयांची बाकी होती. तुझ्या सर्व स्पर्धा परीक्षा अजून बाकी होत्या. या स्पर्धा परीक्षा झाल्या नंतरच तुला इंजिनिअरिंग मध्ये प्रवेश मिळणार होता. एप्रिल मध्ये सी.ई. टी. होणार होती. पण वाढत्या करोना संक्रमणामुळै परीक्षेची तारीख जाहिर होत नव्हती. तुझा अभ्यास नीट व्हावा यासाठी मी सतत प्रयत्नशील होते. तुझी प्रतिकारशक्ति वाढवण्यासाठी रोज सकाळी खीर करत होते व संध्याकाळी गरम सूप. करोनाची तर भिती होती वर परीक्षेचा ताण. भाजीपाला, फळे, धान्य याच्या टंचाईतही व्यवस्थित स्वयंपाक करत होते. भांडी, घराची साफसफाई या कामांचा खूप ताण पडत होता. पण कधी तुला कोणतेही काम लावत नव्हते. तुला अभ्यास करायला अधिक वेळ मिळावा इतकी अपेक्षा होती.
जून महिना आला आणि तुझा बारावीचा निकाल लागला. 72% मार्क विज्ञान शाखेत प्राप्त झाले. एरवी तू तर गणितात 100/100 मार्क मिळवणारा... नेमके काय बरं चूकले....?" काही कमी नाहीत, ओमचे मार्क बरेच आहेत हो....तुझ्या आजीचा फोन आला. हताश मन थोडे सावरले आणि तुला रडताना पाहून खंबीर झाले. सर्व स्पर्धा परीक्षा अजून बाकी होत्या. तसेच हा बारावीचा निकाल कुठल्याही काॅलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी उपयोगी नव्हता. तुला परत अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले आणि या बारावीच्या निकाला च्या दिवसापासून तू खूपच जोरात अभ्यास करू लागलास....
श्रावण महिना आला... करोनामुळे आपली इमारत सील झाली. बाजूच्या समोरच्या घरात करोना....अजून सी.ई.टी परीक्षा झाली नव्हती. त्यात राजकारण.... परीक्षा घ्यावी की नाही यावर देशात वादळ निर्माण झाले. तुला तर हताश वाटू लागले. मग मी ठरवले या परिस्थितीतून काही मार्ग शोधायचा. मुंबईच्या काही नामांकित काॅलेजांनी मुलांची स्वतंत्र परीक्षा घ्यायची ठरवली. एका नामांकित विद्यापीठाच्या परीक्षेसाठी अर्ज भरला. आनलाईन परीक्षा झाली तुला सहज प्रवेष मिळाला, खूप स्पर्धा असली तरी सहज निवड झाली. आनंदाने आभाळ ठेंगणे झाले माझे. पहिल्याच ईंजिनिअरिंग परीक्षेत 10/10 सी.गी.पी.ए. प्राप्त केल्यानंतर एक एक यशाचे शिखर तू चढत गेलास.
मग चौथ्या वर्षी आला प्लेसमेंट सीझन...... 200 मुलांमध्ये सहजपणे नोकरीसाठी तुझी निवड झाली. आता काय पुढे काय करायचे हा निर्णय तूच घ्यायचा आहेस. .... शिक्षण की नोकरी.... इतके वर्ष तुझा अभ्यास चांगला होण्यासाठी केलेल्या परिश्रमांचे सार्थक झाले. अशीच सकारात्मक वाटचाल ठेव.आपल्या देशाचा आदर्श नागरिक हो....
यशस्वी भवः
तुझीच आई,
सौ. सोनाली टोपले....