
मराठी टिकवून ठेवणे मराठी भाषकाचे कर्तव्य -- खासदार राहुल शेवाळे
मराठी टिकवून ठेवणे मराठी भाषकाचे कर्तव्य -- खासदार राहुल शेवाळे
एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकाचा शेवट होत असतानाच संपूर्ण जगाला कोरोना विषाणूच्या अभूतपूर्व संकटाने हादरा दिला आहे. या हादऱ्याचा संपूर्ण जगाला सर्वच क्षेत्रात मोठा फटका बसला आहे. सर्वच देशांनी आपापल्या पद्धतीने कोरोनाशी लढा देत त्यावर मात करण्याचे प्रयत्न केले. भारतानेही कोरोनाचा प्रभावीपणे सामना केला. भारताच्या या प्रभावी लढ्याचे जगभरातूनही मोठे कौतुक करण्यात आले.
आपल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ निर्णय घेतल्याने कोरोनावर उपाययोजना आपल्याला प्रभावी करता आल्या. पोलीस आणि डॉक्टर्स हे देवदूतांसारखे अहोरात्र माणसाला जीवदान देण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता झगडत होते हे सुद्धा आपण पहिले. जगभरात होत असलेल्या हानीच्या तुलनेत आपल्या देशात चांगली परिस्थिती आहे. प्रचंड लोकसंख्येच्या ताणामुळे तर कोरोना संकटाचा सामना करताना वेगवेगळ्या आघाड्यांवर महाराष्ट्र सरकारला लढा द्यावा लागला असे मत खासदार राहुल शेवाळे यांनी धुरू हॉल येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मांडले. मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने मराठी भाषा दिवस कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यात पुन्हा कोरोनाचं सावट सुरू झाले आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्ध लढताना पक्षभेद, जातीभेद, धर्मभेद विसरून आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे. कोरोनाचा लढा हा राजकारणाचा विषय नाही असेही ते म्हणाले. याचबरोबर मराठी भाषा दिनाचे औचित्य साधताना ते आपल्या भाषणात पुढे असेही म्हणाले की, इये मऱ्हाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करता, करता ब्रम्हविद्या म्हंटले आहे, शब्दब्रह्मही म्हंटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा जगभरात राहणाऱ्या सर्व मराठी बांधवाना सार्थ अभिमान वाटतो. एकीकडे इंग्रजीच्या वाढत्या वापरामुळे मूळ मराठी भाषा बदलत आहे. त्यामुळे आपले कर्तव्य म्हणून यापुढे दैनंदिन बोलीभाषेतून मराठीचे संवर्धन करणे, मराठीचे सौंर्दय, खानदानीपणा टिकवून ठेवणे हे प्रत्येक मराठी भाषकाचे कर्तव्य आहे. भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी समस्त मराठीजनाची मागणी आहे, त्यासाठी दिल्लीदरबारी एक महाराष्ट्रातील खासदार म्हणून मी सातत्याने पाठपुरावा करणार आहे.
मराठी भाषा दिवसाच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून विचार मांडताना चित्रलेखाचे संपादक ज्ञानेश महाराव म्हणाले की, जोपर्यंत दोन मराठी माणसे एकमेकांशी भांडताना शिव्यांचा वापर करतील तोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहणार आहे. गेल्या अनेक शतकात हजारो ज्ञानवंतांनी मराठी भाषेचे वैभव वाढविण्यासाठी, जपण्यासाठी त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न केले. दीड दिवसांची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊ साठेंनी प्रबोधनाचे फार मोठे काम केले. त्यांनीच पहिल्यांदा शिवरायांचं नाव देशाबाहेर नेलं. सावित्रीबाई फुले, म.ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे इत्यादी महापुरुषांनी समाजाला जागृत करण्याचं, शिक्षित करण्याचं काम प्रामुख्याने केले. ज्ञानेश महाराव यांनी आपल्या भाषणात बुवाबाजी, कर्मकांड आणि जातियवाद्यांवर घणाघाती प्रहार केले. बुवाबाजी, कर्मकांड ह्या भ्रामक गोष्टी आहेत. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन करताना आणि ते वाढविताना तिथी आणि मुहूर्त कधी पाहिले नाही. परंतु सुशिक्षित लोक अजूनही वास्तुशास्त्राचा आधार घेतात. घरात दिशा शोधणाऱ्यांची नेहमीच ‘दुर्दशा’ झाली, त्यामुळे सुशिक्षितांनी भावनेच्या आहारी जाण्यापेक्षा बुद्धीने विचार करावा असे आवाहन केले. महाराव यांनी आपल्या भाषणात संत बहिणाबाई, संत तुकाराम, कबिर, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, तुकडोजी महाराज यांच्या ओव्या, अभंग उद्धृत करुन भटशाही हा सामाजिक आणि राजकीय रोग असल्याचे ठासून सांगितले. देशातील बहुजन समाज बुद्धीचा वापर न करता भावनेच्या आहारी जात असल्याने मातीचे गोळे डोक्यावर घेऊन बुडविले जातात. ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असते, तो देश मोठा कसा होणार? असा परखड सवाल ‘चित्रलेखा’चे संपादक आणि फर्डे वक्ते ज्ञानेश महाराव यांनी उपस्थित केला.
संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रास्ताविकात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी माणूस, मराठी व्यवहार यासाठी संस्थेने गेल्या ७२ वर्षात केलेल्या कार्याचा आढावा घेताना संस्थेची जागा मुंबई मनपाने खाली करण्याची नोटीस देऊन कामकाजाला - उपक्रमांना जी खीळ घातली आहे त्याचा निषेध केला आणि खासदार राहुल शेवाळे यांनी संघाला छप्पर मिळवून देण्याची विनंती केली.
भारतीय पोलीस सेवा, सहाय्यक पोलीस महानिरीक्षक धोरण आणि मासिक दक्षताच्या सरसंपादक श्रीमती शिला दिनकर साईल, दादर सार्वजनिक वाचनालयाच्या प्रमुख कार्यवाह शुभा दत्ता कामथे, मराठी विचारधारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऍडव्होकेट देवदत्त लाड हे याप्रसंगी व्यासपीठावर पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुप्रसिद्ध गायक गणेश कळंबे, अभिषेक शेलार यांचा मराठी गझलांचा सुरेल कार्यक्रम झाला. संघाचे माजी अध्यक्ष प्रकाश पांडुरंग नागणे आणि ज्येष्ठ वृत्तपत्रलेखक चंद्रकांत पाटणकर यांना प्रदीर्घ काळ वृत्तपत्रलेखन केल्याबद्दल आणि चळवळीसाठी निष्ठेने योगदान दिल्याबद्दल सन्मानपूर्वक जीवन गौरव सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संघाच्या ४६ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक पारितोषिक समारंभ पार पडताना आंतर भारती या अंकास का र मित्र स्मृती सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक तर इतर २० अंकांना उत्कृष्ट अंक म्हणून गौरविण्यात आले.
मराठी विचारधारा प्रतिष्ठान आणि दासावा यांच्या सहकार्याने व मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लेख स्पर्धा (१) डिजिटल युग - मराठी वाचन संस्कृतीला तारक कि मारक (२ ) माझी मराठीची बोलू कौतुके (३) अस्सल मराठी बोलीभाषेतील कविता ऑनलाईन व्हिडीओ स्पर्धा यात यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके यावेळी देण्यात आली. प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगावकर यांनी स्वागत, सूत्रसंचालन कार्याध्यक्ष रमेश सांगळे तर आभार प्रदर्शन अरुण खटावकर यांनी केले. दासावाचा कार्यालयीन कर्मचारी वर्गासह माजी अध्यक्ष अध्यक्ष मनोहर साळवी, माजी अध्यक्ष विजय कदम, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, सुनील कुवरे, प्रशांत भाटकर, नितीन कदम, दिगंबर चव्हाण, श्रीराम मांडवकर, राजन देसाई यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
"मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेचे कार्य आणि या चळवळीचे महत्वपूर्ण योगदान पाहता आणि ही संस्था माझ्या मतदारसंघात येत असल्याने या संस्थेच्या कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे माझे यापुढच्या काळात आद्य कर्तव्य ठरणार आहे. लवकरच त्याची पूर्तता होईल" असे आश्वासन खासदार राहुल शेवाळे यांनी व्यासपीठावरून दिले.