वॉशिंग मशीन ने जीव घेतला !!

वॉशिंग मशीन ने जीव घेतला !!

        (ज्येष्ठ पत्रकार - रमेश औताडे) 

        चेहरा घामाघुम झालेल्या अवस्थेत घाबरलेल्या असलमने आपल्या पत्नीचा मृतदेह एका वाहनामधुन मित्राच्या मदतीने स्मशानभुमीच्या गेटपर्यंत आणला होता. गेटवर गाडी उभी करुन तो खाली उतरला.  स्मशानभुमीत भयाण शांतता होती. पक्षांचा किलबिलाट व एक निरव शांतता पसरलेली होती. आदल्या दिवशी कोणाच्यातरी प्रेताला अग्नी दिला होता. त्या प्रेताची राख झाली होती. बारीकसा धुर त्या राखेतुन येत होता. असलम हे सर्व पाहत तिथे कुणी कर्मचारी आहे का पाहण्यासाठी आपली नजर इकडेतिकडे फिरवत होता. तेवढयात असलमला एका पुरुषाचा आवाज आला..... कोण पाहीजे? असलमने मागे वळुन पाहिले तर स्मशानातील एक कर्मचारी असलमच्या मागे उभा होता. काय काम आहे? कोणाला शोधता आहे तु? कशाला आला आहे इथे? असे त्या स्मशानभुमीतील कर्मचाऱ्याने विचारले असता असलम म्हणाला, मेरी पत्नी बाहर गाडी में हे, उसको दफनाना हे. असे घाबरत घाबरत बोलु लागला. तेव्हा तो कर्मचारी म्हणाला, तो लेके आओ, दफना देंगे. तेव्हा असलम आपल्या पत्नीला आणण्यासाठी गाडीजवळ जात असताना त्या कर्मचाऱ्याने असलमला आवाज दिला, अरे भाइ सुनो, पहले मृत्युका दाखला दे दो तब तक इंट्री करता हु. तेव्हा असलम चपापला. घाम पुसत म्हणाला, मेरे पास मृत्यु का दाखला नही. खरोखरच असलमकडे पत्नी अबिदाच्या मृत्युचा दाखला नव्हता. त्यामुळे असलम आपल्या पत्नीचे दफनविधी त्या स्मशानभुमीत करु शकला नाही. आता काय करायचे? पोलीसांचा ससेमीरा मागे लागण्याअगोदर अशा गोंधळलेल्या अवस्थेत असलमने पत्नीचा मृतदेह घरी घेवुन जाण्याचे ठरवले. त्याप्रमाणे त्याने गाडीत बसलेल्या मित्राला इशारा करत गाडी सुरु केली व अबिदाचा मृतदेह घरी आणला. तो मृतदेह त्याने घरात ठेवला. काही वेळाने गोंधळलेल्या अवस्थेत त्याने आपली कपडयाची बॅग भरली व गावी जाण्याचा निर्णय घेतला. टाळा व चावीची शोधाशोध केली. घराला टाळा मारला. पत्नीला घरात ठेवुन तो आपल्या गावी उत्तरप्रदेशला जाण्यास निघाला. आपल्या गावी पळुन गेल्यावर कुणाला संशय येणार नाही. असे त्याला वाटले. पत्नी चक्कर येवुन पडली आहे. त्यामुळे मी काही दोषी नाही असा त्याचा समज झाला व तो गावी पळुन गेला. 

     पत्नीच्या मृतदेहाची काही दिवसांनी घरातुन दुर्गंधी येउ लागली. आजुबाजुला कुजबुज सुरु झाली. शेजारील लोकांनी पोलीसांना फोन केला. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरवाजा तोडला. पोलीसांनी घरात प्रवेश केला तर घरात अबिदाचा कुजलेला मृतदेह दिसला.  कुजलेलल्या अवस्थेत असलेला अबिदाचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला. पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. शेजारी लोकांना काही कळेना. असलम व अबिदा या भाडयाच्या घरात राहत होते, पोलीसांनी घराच्या मालकाला पोलीसांनी लगेच बोलावले. घर मालकाकडुन असलमची सर्व माहिती घेतली. मालकाकडे सर्व माहिती होती. गावचा पत्ताही होता. त्यामुळे असलमला शोधत पोलीसांचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. उत्तर प्रदेश मधुन एका गावातुन पोलीसांनी असलमच्या मुसक्या आवळल्या.       

     असलमकडे पत्नीच्या मृत्युचा दाखला का नव्हता? उत्तरप्रदेशला तो का पळुन गेला? याबाबत पोलीसांना विचारले असता एक साधी गोष्ट गंभीर स्वरुपात समोर आली. असलमचे व अबिदाचे तीन महिन्यापुर्वी लग्न झाले होते.

       भाषांतरकाराची नोकरी करणारा असलम जेमतेम पैस कमवत होता. काटकरसर करणारा असलम पैशाच्या मागे लागला नसला तरी तो पैसा जपुन खर्च करायचा. उत्तरप्रदेश मधील आपल्या गावातुन तो मुंबईत आला. सॅन्डहर्स्ट रोड जे जे मार्ग येथे राहण्यासाठी जागा शोधु लागला होता. त्याला एका ठिकाणी भाडयाची खोली मिळाली. या भाडयाच्या खोलीत असलमचा संसार सुरु झाला. अबिदाला लोकांशी बोलायची सवय होती. आजुबाजुच्या लोकांशी ती बोलु लागली. पुरुषांबरोबर ती जास्त बोलायची. असलमने तिला अनेक वेळा समजावले होते. तुझा हा प्रकार मला आवडत नाही. तरीही तीने आपली बोलण्याची सवय सुरुच ठेवली होती. हि सवय ती काही बंद करत नाही म्हणुन असलम काहीही न बोलता शांत होता. मात्र काही दिवसांनी त्याला कळले की, लग्नाअगोदर आपल्या पत्नीचे प्रेमप्रकरण होते. आपल्या पत्नीचे असे कारनामे जर कुठल्याही पतीच्या कानावर पडले तर त्या पतीला झोप लागत नाही. तसेच असलमचे झाले. तो बेचैन झाला. त्यालाही झोप येइना. काही दिवसांनी दोघात वाद सुरु झाले. अबिदा मात्र सवयीप्रमाणे आपली बोलण्याची हौस पुर्ण करुन घेत होती. शेवटी व्हायचे तेच झाले. त्या दिवशी असलम दमुन भागुन कामावरुन घरी आला. आल्या आल्या नवऱ्याला चहा पाणी देण्याऐवजी अबिदाने असलमला कपडे घुण्याचा त्रास होत आहे मला वॉशिंग मशिन पाहीजे अशी मागणी केली. त्योवळी असलम शांतपणे म्हणाला  आता आपल्याकडे पैसे नाहीत. पुन्हा कधीतरी घेवुया असे असलमने अबिदाला सांगितले. मात्र अबिदा काही ऐकायला तयार नव्हती. काही महिलांप्रमाणे तीही रागाला आली. त्यानंतर हा वाद वाढला व दोघात भांडण झाले. या भांडणात असलमने अबिदाला ढकलुन दिल्याने अबिदा जमीनीवर पडली व बेशुध्द झाली. असलमने तिला हालवले शुध्दीवर आणण्याचा प्रयत्न केला मात्र, बेशुध्द झालेली अबिदा शुध्दीवर आली नाही. ती कायमचीच बेशुध्द झाली. असलमला काही सुचेना म्हणुन त्याने मित्राला फोन करुन बोलावले. मित्राने व असलमने अबिदा मृत झाल्याची खात्री करत तिचा मृतदेह गोवंडी येथे एका स्मशानभुमीत घेवुन जाण्याचे ठरवले. मात्र तिथे असलमला यश आले नाही.  

       कमी पगार असलेल्या असलमला अबिदाने वॉशिंग मशीन मागीतल्याचा राग आला की पर पुरुषाबरोबर बोलण्याचा राग आला, की बायकोच्या प्रेमप्रकरणाचा राग,  नक्की काय कारण असावे? अबिदाला मृत घोषीत करणारा असलम व त्याचा मित्र हे स्वताच डॉकटरच्या भुमीकेत का शिरले हे चुकीचेच होते. परपुरुषाबरोबर किती व कसे बोलावे हेही अबिदाला कळायला हवे होते. वॉशिंग मशीन पुन्हाही आली असती. मात्र नियतीला या कारणांचे काही घेणे देणे नसते. त्यामुळे लग्नापुर्वीचे किंवा लग्नानंतरचे प्रेमसंबंध व परपुरुषाबरोर किंवा परस्त्रीबरोबर किती व कसे बोलावे या छोटयाशा मात्र महत्वाच्या गोष्टीकडे गांर्भीयाने पाहिले नाहीतर अबिदा व असलम यांच्या या वॉशिंग मशीच्या घटनेची पुनरावृत्ती होतच राहील.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे