पापलेटला मिळाला पत, पण मच्छीमारांच्या पदरी निराशाच !

पापलेटला मिळाला पत, पण मच्छीमारांच्या पदरी निराशाच !

       मासे खवय्यांची सर्वात जास्त पसंती असलेला पापलेट माशाला आता राज्य मासा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे त्याची बाजारातील पत वाढली असली तरी मच्छीमारांच्या पदरी निराशाच पडली आहे. व्यापाऱ्यांनी पापलेटचे दर पाडल्यामुळे मच्छीमारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. एकीकडे समुद्रात पापलेट मिळत नसताना दुसरीकडे दर कमी झाल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पापलेटला अन्य शेतमालाप्रमाणेच हमी भाव निश्चित करावा. अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.

          पापलेटला राज्य सरकारने अलीकडेच राज्य मासा हा दर्जा दिला आहे. मात्र हा मासा समुद्रापासून खवय्या पर्यंत पोहोचवणाऱ्या मच्छीमाराला त्याचा कोणताही फायदा झालेला नाही. उलट व्यापाऱ्यांनी पापलेटचा भाव अचानक कमी केल्याने मच्छीमारांचे आर्थिक नुकसान होत आहे. दुसरीकडे काही दिवसापासून मच्छीमारांच्या जाळ्यात पापलेट कमी प्रमाणात मिळत आहे. मासेमारीचा हंगाम सुरू झाल्यानंतर ऑगस्ट ते नोव्हेंबर पापलेट मुबलक प्रमाणात मिळतो. त्यानंतर मच्छीमार दुसरी मासळी पकडतात.

          मात्र सप्टेंबर पासूनच पापलेटचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यामुळे मच्छीमार अन्य मासळी पकडून आणू लागले आहेत. व्यापाऱ्यांनी पापलेटचे भाव पापलेटचे भाव किलोमागे शंभर ते दीडशे रुपये कमी केले आहेत. एरवी सुपर पापलेटला किलोमागे १४५० रुपये, एक क्रमांकाच्या पापलेटला १२०० ते १३०० इतका दर देत असत. मात्र व्यापाऱ्याने अचानक हात आखडता घेतला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडून अडवणूक होत असल्याचे मच्छीमारांकडून सांगण्यात येत आहे.

          उत्तन परिसरात बाजाराला जागा देण्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. मात्र त्याचे कार्यवाही अद्याप सुरू झालेले नाही. उत्तर परिसरात घाऊक मासळी बाजार नसल्याने मासळी घाऊक बाजारात विकण्यासाठी वसईतील नायगाव अथवा क्रॉफेट मार्केट येथे जावे लागते. त्या ठिकाणी व्यापाऱ्यांचीच मक्तेदारी असते. व्यापारी सांगतील त्याच भावाने मासळी विकण्याचा अन्य पर्याय नसतो.

          मच्छिमार समुद्रातून आले की व्यापारी पापलेट घेऊन जातात आणि मग तीन महिन्यांनी त्याचे पैसे मच्छीमारांना देतात. आता हिशेब करायच्या वेळी व्यापारी पापलेटला दर मिळत नसल्याचे सांगून हात वर करत आहेत. मासेमारीच्या एक खेपे मध्ये मच्छीमार साधारणपणे एक ते दोन टन इतके पापलेट घेऊन येतो.


Batmikar
वार्ताहर - प्रीती तिवारी