विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे कार्य प्रशंसनीय - श्री. बिपिन श्रीमाळी (भा.प्र.से.)

विद्यार्थी उत्कर्ष मंडळाचे कार्य प्रशंसनीय - श्री. बिपिन श्रीमाळी (भा.प्र.से.)

विद्यार्थी उत्कर्ष मंडळासारख्या संस्था जीवनासाठी मार्गदर्शक म्हणून गौरवास पात्र असल्याचे प्रशंसोद्गार कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बिपिन श्रीमाळी भा.प्र.से. यांनी काढले. विद्यार्थी उत्कर्ष मंडळाच्या नुकत्याच पार पाडलेल्या वार्षिक स्नेह सम्मेलनात ते बोलत होते. संस्था गिरणगावात 68 वर्षे अव्याहतपणे कार्यरत असून हे काम सोपे नाही. बाहेरच्या लोकांना सामावून घेणे ही महाराष्ट्र राज्याची संस्कृती असल्याचे त्यांनी नमूद केले. महाप्रीत या संस्थेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असताना “महासूर्या” आणि “मागे वळून पहा” या उपक्रमांबद्दल त्यांनी माहिती दिली.

  कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सिने-नाट्य अभिनेत्री ऋतुजा राजन बागवे यांनी मंडळ पिढी घडविण्याचे पुण्य काम करीत असल्याचे नमूद केले. प्रणाम हस्तलिखित आणि मोडी लिपि अभ्यासक्रमाने विद्यार्थी घडविले जातात. तसेच शिक्षण, कला व क्रीडा याच्या त्रिवेणी संगमाने माणूस समृध्द होतो, असेही श्रीमती बागवे यांनी सांगितले. 

  श्री. गोविंद हळदणकर माजी मंडळप्रमुख तसेच डॉ. रमेश यादव समर्थ ग्रंथालय प्रमुख यांचा षष्ट्यद्विपूर्ती निमित्त  अध्यक्ष्यांच्या यांचे हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच याप्रसंगी माजी मंडळप्रमुख श्री. निलेश घोडेकर यांनी कोविडच्या कालावधीत सातत्याने मंडळाचे सर्व उपक्रम तसेच बैठका ऑनलाईन पध्दतीने यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान केला.

  शालांत परीक्षेत मंडळातून सर्वप्रथम आलेली कुमारी स्वरा प्रदिप वेंगुर्लेकर हिचा सत्कार सन्मानचिन्ह व भेटवस्तू तसेच रोख रक्कम देऊन करण्यात आला. त्याप्रसंगी कुमारी स्वरा हिने तिच्या यशाबद्दल पाल्य, शिक्षक तसेच मंडळाचा सहभाग असल्याचे आवर्जून सांगितले. प्रामाणिकता व मेहनत केल्याने यश सहज प्राप्त होते, असेही तिने नमूद केले. धर्मादाय आयुक्त कार्यालयातील चेंज ऑफ रिर्पोटच्या कामात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल ॲङ मंगेश चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. तसेच सुमारे 12 कोविड योध्दांच्या कामगिरीबाबत प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. 

  यावेळी मंडळाचे आर्थिक स्त्रोत असलेले “शारदास्मृती” अंकाचे प्रकाशन अध्यक्ष श्री. बिपिन श्रीमाळी यांचे हस्ते करण्यात आले, या प्रसंगी प्रणाम हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. तसेच विवेकानंद स्मृती अंकाच्या दरपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. 

  कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार मान्यवर श्री. श्रीमाळी यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळप्रमुख श्री. सचिन हराळे यांनी तर मान्यवरांचा परिचय श्री. रवि तांबे उप मंडळ प्रमुख यांनी केला, गीत श्रीमती समता नागवेकर यांनी तर बोधपटवाचन श्री. मयुर गोळे यांनी केले. आभार सहमंडळप्रमुख श्री. विशाल शिंगटे यांनी मानले. शेवटी मंडळाच्या कलाविभागाच्या वतीने किरण गावडे दिग्दर्शित “शांतेचं कार्ट चालू आहे” हे दोन अंकी धमाल विनोदी नाटक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन श्री. विशाल पोळ, शिक्षण प्रमुख व श्री. साहील पाटील, सहायक शिक्षण प्रमुख यांनी केले.


Batmikar
संपादक - अभिषेक शिंदे