
आम्ही वसईच्या नारी...
आम्ही वसईच्या नारी आम्ही वसईच्या नारी
मी नार कोवळी कोळ्यांची
मी वीण घालते जाळ्याची
डोईवर पाटी म्हावऱ्याची
बाजारच आम्हा तारी
आम्ही वसईच्या नारी
नार आहे मी भंडारी
ताड गोळ्याची रास घरी
सासर माहेर कोसावरी
धंद्यात गुंतलाय कारभारी
आम्ही वसईच्या नारी
नार बाई मी पानमाळी
पान विड्याची आली कोवळी
माडा वरती भरली शहाळी
विकाया जाते मी होळीच्या बाजारी .आम्ही वसईच्या नारी..
सामवेदी मी नार खेडयाची
साधी राहणी हौस वाड्याची
भक्तीत न्हाते तालात गाते सूक्त देवाची भाव ठसलाय माझ्या उरी
आम्ही वसईच्या नारी
नार हाय मी आदिवासी
कष्ट करी दुसऱ्यापाशी
झोपडीत राहते सुखाशी
भरतार माझा हेलकरी
आम्ही वसईच्या नारी
मी नार हाय आग्र्याची
शिव्यात प्रेम लपलेले भारी
आगरान जाते आणते
मासळी मिठाच्या राशी
आम्ही वसईच्या नारी
वसईची मी ख्रिशन
येशु देव माझा प्राण
कुपरीला पाळीला देवानं
फुल ,भाजीपाला माझी शान
जातो धनी मुंबईच्या बाजारी
आम्ही वसईच्या नारी
साऱ्या जातीची ही पंढरी
सत्संगात नटली वारी
जागी मानवता अंतरी
विश्व जागवू आणू स्वर्गही भूमीवरी,,,आम्ही वसईच्या नारी..