
ना मोगरा हवा अन, ना चांदवा हवा मज !!
ना मोगरा हवा अन, ना चांदवा हवा मज
ओठांतला तुझ्या बस, तो गोडवा हवा मज
जाळून राख करतो, हा तप्त देह अग्नी
दे श्रावणातली सर, तो ताजवा हवा मज
भेगाळलो कितीदा, कंपायमान झालो
त्या खोल अंतरीचा, तो गारवा हवा मज
विळख्यात प्रेम आहे, त्यातून मुक्त होतो
जडलाय रोग अंगी, द्या ! बाहवा हवा मज
देवू नको प्रपंचा ! खारा समुद्र इतका
त्या सावत्यास दिधला, तो कालवा हवा मज
ते सातही दिवस मी, कामात व्यस्त असतो
आणू कुठून मित्रा ? जो आठवा हवा मज
इतकेच मागतो मी, तुजला अखेर देवा
माणूस राहण्याचा, बस् जोगवा हवा मज
©® - गझलसंध्या..( अर्जुन शेवडे )
( वृत्त - आनंदकंद )