
युवक सापडला रक्ताच्या थारोळ्यात !!
समता नगर पोलीस ठाणे येथे क्रमांक 1134/2022 कलम 302, 120 ब, 34 भादवी अन्वये गुन्हा नोंद !
दि. 25/07/2022 रोजी 06.57 वा.चे सुमारास हनुमान मंदिराच्या शेजारी, शिवाजी मैदान पोईसर, कांदिवली पूर्व, मुंबई येथे एक इसम जखमी स्थितीत मृत अवस्थेत असल्याबाबतचा संदेश मुंबई येथून नियंत्रण कक्षास प्राप्त झाला. रात्रपाळी कर्तव्यावरील पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने सत्वर घटनास्थळी भेट दिली असता नमूद ठिकाणी दिपक बघेलू राजभर, वय 30 वर्षे हा रक्ताच्या थारोळ्यात अंगावर धारदार शस्त्राने जखमा झालेल्या स्थितीत म़ृतावस्थेत असल्याचे दिसून आले. सदरहु घटनास्थळ तातडीने संरक्षित करून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळी व भोवतालच्या परिसरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही फुटेजेसच्या परीक्षणामध्ये समतानगर पोलीस ठाणेच्या अभिलेखावरील शरीराविरुद्ध दाखल गुन्ह्यांतील आरोपी नामे दिपक वाकले उर्फ पोलार्ड व त्याचे आणखी सात ते आठ साथीदारांनी दिनांक 25/07/2022 रोजी 00.15 ते 00.45 वाजताच्या दरम्यान मयत व्यक्तीवर धारदार शस्त्रानिशी हल्ला करुन त्याची निर्घुण हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अधिक तपासामध्ये गुन्ह्यातील सहभागी सर्व आरोपीतांची ओळख पटवून सत्वर शोध मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये निष्पन्न आरोपीतांपैकी आरोपी नामे 1. सोनु उर्फ दमआलु सचिंद्र चौधरी, वय 20 वर्षे व 2. आदित्य कृष्णकुमार चौबे, वय 21 वर्षे यांना त्वरित प्रभावे ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
यातील बळीत व्यक्ती नामे दिपक राजभर उर्फ करिया हा सुद्धा अभिलेखावरील शरीराविरुद्धच्या गुन्ह्यात आरोपी असून दिनांक 14/07/2022 रोजी वरील निष्पन्न आरोपीत आणि बळीत व्यक्ती व त्याचे इतर साथीदार यांचेमध्ये किरकोळ वादावरून गैरकायद्याची मंडळी जमवून एकमेकांस मारहाण केल्याप्रकरणी 1090/2022 कलम 325 324 323 504 141 143 147 व 1091/2022 कलम 324 141 143 147 भादवि असे क्रॉस गुन्हे नोंद करण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील दोन्ही बाजूंकडील आरोपीतांना अटक करून त्यांचे वर कलम 107, 110 सीआरपीसी अन्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती.
त्याच घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशातून आरोपीतांनी उपरोक्त गुन्हा केल्याचे निष्पन्न होत आहे. यातील मयत व्यक्ती व मुख्य आरोपी त्यांचे विरुद्ध असणारा अभिलेख प्राप्त करण्यात आला आहे. उपरोक्त गुन्ह्याचा तपास जारी असून पाहिजे आरोपीतांचे शोधार्थ परिमंडळ स्तरावरील विशेष अधिकारी व अंमलदाराचे पथक प्रयत्नशील आहेत. पाहिजे असलेले आरोपीतांना सत्वर अटक करण्यात येणार आहे.