जे मला होते अपेक्षित !!

जे मला होते अपेक्षित !!

*** गझल ******


जे मला होते अपेक्षित ते घडाया लागले

रंग इथल्या माणसांचे उघड व्हाया लागले


जे म्हणे सेवक स्वतःला तेच मोठे भामटे

नेमके लोकास आता हे कळाया लागले


भोगली सत्ता जयांनी पाडल्यावर पालथे

जे मुके ते केवढ्याने बडबडाया लागले


केवढी दहशत तयांची बोलले नाही कुणी

बांधल्या धरणातले पाणी मुराया लागले


जन्मभर केलीच नाही मान ज्यांनी वर कधी

रग खरी या शिक्षणाची गुरगुराया लागले


मी कधी होतो असा का दोष का देते मला

बाजले झाले जुने जे कुरकुराया लागले


त्रास का वाटून घेते दूर ते गेल्यावरी

तू दिलेल्या तर बळावर ते उडाया लागले


पाहिले पाण्यात ज्यांनी जन्मभर होते तुला

पाहुनी प्रगती तुझी ह्दयी झुराया लागले


लागला टाळायला तू सोबती घेणे तुझ्या 

सोबतीने सांज ताऱ्यांच्या फिराया लागले


तू मिटवलेली निशाणी थोर कार्याची जरी

मी मनी या थोर लोकांच्या मुराया लागले....


बबन धुमाळ

(पुणे)


Batmikar
बातमीकार

Most Popular News of this Week