सृष्टीस भूल पडते...... गझल
वृत्त:- आनंदकंद
( गागाल गालगागा गागाल गालगागा )
सृष्टीस भूल पडते, तो रंग आगळा मी...
राधेस भावलेला, श्रीकृष्ण सावळा मी...
उद्रेक वासनेचा, छळतो मनास माझ्या
पाहू कसा बरे तो, निर्लज्ज सोहळा मी...
ध्येयास का करावे, स्वाधीन पैंजणांच्या
माझ्याच मुक्ततेला, माझाच अडथळा मी...
बेभान भावनांना, घालू लगाम कैसा
उपदेश टाळणारा, निर्बुद्ध ठोकळा मी...
माझ्या मनात आहे, घ्यावी गगन भरारी
तोडू कसा विकारी, हा कर्म सापळा मी...
आहे अखंड चालू, संघर्ष जीवनाचा
सोडीन का कधी तो, निश्वास मोकळा मी...
नाजूक फार आहे, काळीज या ध्रुवाचे
काव्यात प्राण भरतो, नेमस्त आगळा मी...
_ध्रुव (पुणे)